पनवेल तालुक्यातील नद्यांचे अस्तित्व धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 03:05 AM2019-02-19T03:05:48+5:302019-02-19T03:06:04+5:30
प्रदूषणाचा फटका : नद्यांच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजनांची गरज
वैभव गायकर
पनवेल : पनवेल परिसरातील नद्यांना प्रदूषणाचा विळखा पडला आहे. नद्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नद्यांच्या संवर्धनासाठी केंद्र शासनाने विविध उपक्र म सुरू केले आहे. त्यासाठी हजारो कोटी रूपये खर्च केले जात आहेत. मात्र पनवेलमधील नद्यांचे अस्तित्व टिकविण्यासंदर्भात कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. पनवेल तालुक्यातील कासाडी, गाढी, काळुंद्रे या नद्यांची अवस्था गंभीर झाली आहे. प्रदूषणामुळे नद्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. घोट नदीसारख्या उपनद्या देखील प्रदूषणाच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. त्यामुळे नद्यांमधील वन्य व जीवसृष्टी धोक्यात आली आहे. नद्यांच्या प्रदूषणाचा फटका आजूबाजूच्या वसाहतींना बसला आहे. पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय बंद झाला आहे. प्रक्रि या न केलेले कारखान्यांतील सांडपाणी, हॉटेलसह जैविक कचरा, नदी तटावरील अतिक्रमणे आदीमुळे नद्यांचे पाणी दूषित होत आहे. तळोजा औद्योगिक विभागातून जाणारी कासाडी नदी आजमितीस सर्वात प्रदूषित नदी म्हणून ओळखली जाते. या नदीचे पाणी पूर्णपणे काळवंडले आहे . कारखान्यातील घातक रसायन मिश्रित पाणी या नदीत सोडले जाते. त्यामुळे या नदीची घोट उपनदीसुध्दा प्रदूषित झाली आहे. या दोन्ही नदीच्या प्रदूषणामुळे या परिसरातील शेकडो वर्षांपासूनची गणेश विसर्जनाची परंपरा यावर्षी खंडित झाली.
तळोजामधील नदी प्रदूषणामुळे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली आहे. या संदर्भात हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीला उपाययोजना राबविण्याचे आदेश देखील दिले आहेत .
पनवेल शहरातून जाणारी गाढी नदीची देखील हीच अवस्था आहे. पनवेल शहरासह सिडको वसाहतीमधील प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे या नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे एकेकाळी या नद्यांचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असे. परंतु प्रदूषणामुळे गुरांना देखील पाणी अपायकारक ठरत आहे. काळुंद्रे नदी प्रदूषणाने हिरवीगार झाली या ठिकाणी पार पडणारे धार्मिक विधी आता बंद झाले आहेत.
तळोजामधील कासाडी नदी मधील प्रदूषणाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे . म्हणून यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादामध्ये धाव घेतली आहे . हरित लवादाने प्रदूषणा संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते . पुढील महिन्यात हा अहावल सादर केला जाणार आहे.
- नगरसेवक अरविंद म्हात्रे,
याचिकाकर्ते
तळोजा आद्योगिक वसाहती मधील घोट व कासाडी नद्यांची अवस्था अतिशय बिकट आहे . प्रदूषणामुळे येथील नद्यामधील मासेमारी व्यवसाय नष्ट झाला आहे . विशेष म्हणजे यासंदर्भात वारंवार आवाज उठवून देखील संबंधित प्राधिकरणामार्फत या उपाययोजना होत नाही .
- हरेश केणी,
स्थानिक नगरसेवक