रायगडावरील वाघबीळ, नाणे दरवाजाचे अस्तित्व धोक्यात
By Admin | Published: April 17, 2017 04:19 AM2017-04-17T04:19:48+5:302017-04-17T04:19:48+5:30
रायगडचा ऐतिहासिक वारसा नष्ट होऊ लागला आहे. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या जगातील सर्व गुहांपेक्षा वेगळी रचना असणाऱ्या वाघबीळ अर्थात
नामदेव मोरे , नवी मुंबई
रायगडचा ऐतिहासिक वारसा नष्ट होऊ लागला आहे. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या जगातील सर्व गुहांपेक्षा वेगळी रचना असणाऱ्या वाघबीळ अर्थात नाचणटेपाच्या गुहेकडे जाण्यासाठी मार्गच उपलब्ध नाही. प्रसिद्ध नाणे दरवाजाच्या छताची पडझड झाली असून, ती कमानही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
रायगड ही मराठा साम्राज्याची राजधानी असल्याने गडाची उभारणी करताना कोणतीही चूक राहणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. गडाच्या रक्षणासाठी चारही बाजूने व पायथ्यालाही आवश्यक तेथे टेहळणी बुरूज व इतर उपाययोजना केल्या होत्या. या सर्वांमध्ये वाघबीळचाही समावेश आहे. नाचणपेटची गुहा अशीही ओळख असली, तरी नवीन ट्रेकर्स त्याला ‘गन्स आॅफ पाचाड’ म्हणून ओळखत आहेत. गडाच्या पायथ्याशी पाचाड खिंडीतून चार ते पाच मिनिटे चालत गेले की वाघबीळ गुहा येते. जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना वेगळी आहे. गुहेपर्यंत जाईपर्यंत तिचे प्रवेशद्वार दिसतच नाही. पायी गेले की गुहेचे प्रवेशद्वार दिसते व एक छोटीशी गुहा असा भास होतो; पण प्रत्यक्षात आतमध्ये गेल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. समोरील बाजूला गुहेला दोन तोंडे दिसतात. येथून पाचाडचा भुईकोट किल्ला, जिजाऊंचा राजवाडा, पाचाड गाव ते पाचाड खिंडीपर्यंतचा सर्व रस्ता स्पष्ट दिसतो; परंतु पलीकडून येणाऱ्यांना गुहा अजिबात दिसत नाही. दुसऱ्या बाजूने रायगडवाडी ते काळ नदीपर्यंतचे सर्व दृृश्य दिसते. अश्मयुगीन काळातील तीन तोंडे असलेली ही एकमेव गुहा आहे. येथून शत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात होते; पण सद्यस्थितीमध्ये या गुहेकडे जाण्यासाठी मार्गच नाही. पायथ्याला असणाऱ्या हॉटेलच्या मागून चिंचोळ्या पायवाटेने तेथे जावे लागत आहे. गड पाहायला येणाऱ्या ९0 टक्के पर्यटकांना या गुहेविषयी माहितीही नाही. गुहेमध्ये त्याची माहिती देणारी व ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करणारी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
गडाच्या पायथ्यालाच नाणे दरवाजा आहे. या दरवाजातून गडावर जाण्यासाठी पायवाट आहे. अनेक शिवप्रेमी पायऱ्यांऐवजी याच मार्गाने गडावर जाण्यास प्राधान्य देतात. रायगडवाडीपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर हा दरवाजा आहे. येथून महादरवाजा १ हजार फूट उंचीवर आहे. महाराजांचा गडावर जाण्याचा मार्ग अशी याची ओळख आहे; पण योग्य देखभाल केली नसल्याने नाणे दरवाजाचे अस्तित्व नष्ट होऊ लागले आहे. प्रवेशद्वाराच्या दोन कमानींवरील छत कोसळले असून फक्त सांगाडा शिल्लक आहे. कमानीवर कमलपुष्प कोरले असून दोन्ही कमानींच्या मध्ये पहारेकऱ्यांची कोठी असून उजव्या बाजूच्या कोठीमध्ये मारुतीची मूर्ती आहे. पुरातत्त्व विभागाने वाघबीळप्रमाणे नाणे दरवाजापाशी माहिती फलक लावलेला नाही.
वाघबीळ गुहा हा निसर्गाचा चमत्कार आहे. तीन तोंडे असणारी गुहा नैसर्गिक टेहळणी चौकीची भूमिका बजावत आहे. या गुहेकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलकच नसल्याने पर्यटकांना याची माहिती मिळत नाही. गडाच्या पायथ्याशी वाघबीळ व नाणे दरवाजाकडे जाणारे दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. - किरण ढेबे, पर्यटक.
इतिहासप्रेमी आप्पासाहेब परब यांच्यासह अनेक शिवप्रेमी नाणे दरवाजानेच गडावर जातात. रोपवे व पायरी मार्गाचा वापर करत नाही. नाणेदरवाजा मार्गाने शिवाजी महाराज गडावर जात असल्याने या मार्गाला विशेष महत्त्व आहे. - सीताबाई आखाडे, स्थानिक महिला.
नाणे दरवाजाकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक नाहीतनाणेदरवाजाच्या दोन स्वागत कमानींच्या छताची पडझड
गडावर जाण्यासाठी पायवाट असल्याची माहिती पर्यटकांना नाही
गडावर जाण्यासाठी पायवाटेबाबत दिशा-दर्शक मार्गिका नाही