नवी मुंबई - पोलिसांनी गतवर्षात तब्बल १०७ जणांची मायदेशी रवानगी केली आहे. त्यामध्ये ३५ नायजेरियन, नऊ युगांडाच्या व्यक्तींसह ५९ बांगलादेशींचा समावेश आहे. भारतात बेकायदेशीररीत्यावास्तव्य करताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करणारी विदेशी नागरिकांची पोलिसांपुढे डोकेदुखी वाढत आहे. त्यांच्याकडून दलालांच्या मदतीने भाडोत्री जागा मिळवून समूहाने वास्तव्य केले जात आहे. त्यापैकी बहुतांश व्यक्तींचा गुन्हेगारी कृत्यात सहभाग असल्याचे वारंवार समोर येत आहे. त्यानुसार मागील दोन वर्षांपासून पोलिसांच्या विशेष शाखेकडून विदेशी नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.याकरिता अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले होते. उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उलवे येथे टाकण्यात आलेल्या अशाच एका छाप्यात मोठ्या प्रमाणात नायजेरियन व्यक्ती आढळून आल्या होत्या. त्यांच्याकडे भारतात प्रवेश केल्याचा अथवा वास्तव्याचा कसलाही पुरावा नव्हता. तर बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिक पनवेलमधील एका कुटुंबीयांचा घरजावई बनल्याचाही प्रकार उघडकीस आला होता.गृहमंत्रालयाला नावे कळविलीसातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे पोलिसांकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यानुसार २०१९ मध्ये वर्षभर राबवण्यात आलेल्या कारवाईत ४८ विदेश नागरिकांना मायदेशी पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये ३५ नायजेरियन, युगांडाचे नऊ जण, सीरियाचा एक व इतर देशातील तिघांचा समावेश आहे.त्याचप्रमाणे ५९ बांगलादेशींनाही परत पाठवण्यात आले आहे. कारवाई झालेल्या या व्यक्ती पुन्हा भारतात येऊ नयेत, याचीही खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे. त्याकरिता या विदेशी नागरिकांची नावे गृह मंत्रालयाला देऊन त्यांची नावे काळ्या यादीत टाकण्याचे सुचवले आहे. त्यामुळे नवी मुंबईत विदेशी नागरिकांची वाढती घुसखोरी नियंत्रणात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
घुसखोर १०७ जणांची मायदेशी रवानगी, नायजेरियन्ससह बांगलादेशींचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 2:25 AM