निवडणुकीत जनतेला परिवर्तन अपेक्षित, गणेश नाईक यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 01:54 AM2019-04-28T01:54:53+5:302019-04-28T01:55:11+5:30
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात निराशा केली आहे, त्यामुळे जनता परिवर्तनासाठी सज्ज झाली आहे.
नवी मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात निराशा केली आहे, त्यामुळे जनता परिवर्तनासाठी सज्ज झाली आहे. ठाणे आणि कल्याणमध्ये मतदार चमत्कार घडवितील. या दोन्ही मतदारसंघात आघाडीचा उमेदवार कासवाच्या भूमिकेत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांनी केले आहे.
शनिवारी सांयकाळी ५ वाजता लोकसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला. तत्पूर्वी नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यास आम्ही काही प्रमाणात कमी ठरल्याने २०१४ मध्ये मतदारांनी भाजप आणि शिवसेनेला संधी दिली; परंतु पाच वर्षांत या सरकारने सर्वच आघाड्यांवर जनतेची घोर निराशा केली आहे. त्यामुळे लोकांत परिवर्तनाचे वातवरण निर्माण झाल्याचे नाईक यांनी या वेळी स्पष्ट केले. प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची बांधकामे नियमित करणे, पॉपर्टी कार्ड आणि सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या मुद्द्यावर प्रकल्पग्रस्तांत काही प्रमाणात खदखद आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या काही संघटनांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. न्याय हक्कासाठी ठाम भूमिका मांडणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या संघटनांना बोगस म्हणून हिणवणाºया सत्ताधाऱ्यांना मतदानातून उत्तर द्या, असे आवाहन नाईक यांनी केले. यावेळी शिवसेनेची देव, धर्म आणि देशाविषयीची भूमिका दुटप्पीपणाची असल्याची टीका त्यांनी केली. राजकीय द्वेषातून या मंदिरावर कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला. बावखळेश्वर मंदिराबाबत शिरीष वेटा नावाच्या एका भाविकाने एक पुस्तिका लिहिली आहे. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला ती प्रकाशित करण्यात आली होती. या पुस्तकात काही आक्षेपार्ह असेल तर वेटा यांची खुशाल चौकशी करा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
या वेळी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, माजी खासदार संजीव नाईक, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृहनेते रवींद्र इथापे, काँग्रेसचे संतोष शेट्टी आदी उपस्थित होते.
शहरातील भेडसावणाऱ्या समस्यांमुळे जनतेत नाराजी
गरजेपोटीची बांधकामे नियमित करणे, पॉपर्टी कार्ड आदी मुद्द्यावर प्रकल्पग्रस्तांमध्ये काही प्रमाणात खदखद आहे.
सिटी सर्व्हेक्षणाच्या मुद्द्यावरही अनेक वाद-विवाद सुरू असून काही संघटनानी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
बावखळेश्वर मंदिरावरील कारवाईनंतर काही पत्रके नवी मुंबई वितरित झाल्याची तक्रार शिवसेनेने पोलिसांकडे केली आहे.