जुन्या वह्यांच्या पुनर्वापराची मोहीम
By admin | Published: June 26, 2017 01:44 AM2017-06-26T01:44:33+5:302017-06-26T01:44:33+5:30
नवीन पाठ्यपुस्तक, वह्या यांच्या खरेदीने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते. मात्र, अशा वेळेस गतवर्षीच्या जुन्या वह्या, पाठ्यपुस्तके मात्र रद्दीत जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवीन पाठ्यपुस्तक, वह्या यांच्या खरेदीने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते. मात्र, अशा वेळेस गतवर्षीच्या जुन्या वह्या, पाठ्यपुस्तके मात्र रद्दीत जातात. यामधूनच विद्यार्थ्यांमध्ये वस्तूंचा पूर्ण वापर आणि पुनर्वापर कसा करता येऊ शकतो याकरिता नेरुळमधील एन.आर.बी एज्युकेशनल सोशल अॅण्ड कल्चरल ट्रस्टच्या शिक्षण प्रसारक माध्यमिक विद्यालयाच्या वतीने जुन्या वह्यांचा पुनर्वापर ही संकल्पना समोर आणली. पर्यावरणाच्या संवर्धनाकरिता विद्यार्थ्यांनी खारीचा वाटा उचलला असून, जुन्या वह्यांमधील शिल्लक कोऱ्या पानांपासून नवीन वह्या तयार केल्या आहेत.
लाकडापासून कागदाची निर्मिती केली जात असून, त्याकरिता होणारा लाकडाचा वापर, वृक्षतोड, झाडांच्या संख्येतील घट, पर्यावरणाचा असमतोल अशा अनेक बाबींविषयी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. कागदनिर्मिती प्रक्रियेत रसायने, पाणी आणि ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशा वेळी विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व कळावे, तसेच पर्यावरण संरक्षणाकरिता उपाय म्हणून जुन्या वह्यांचा पुनर्वापर ही संकल्पना राबविण्यात आली. या माध्यमातून विशेष कार्यशाळेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना जुन्या वह्यांमधील शिल्लक पानांचा वापर करून नवीन वही कशी तयार करता येईल, याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेत सातवी ते नववीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्वत: वह्या तयार केल्या. शालेय विज्ञान मंडळाचे शेखर जगताप यांनी विद्यार्थ्यांना पुनर्वापर आणि कागदाचे महत्त्व पटवून दिले. संस्थेचे अध्यक्ष नामदेव भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जुन्या वह्याच नाही. रोजच्या जीवनातील अनेक गोष्टींचा पुनर्वापर आणि पूर्ण वापर करण्याविषयी मोलाचा सल्ला दिला. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कोठेकर, शिक्षिका वंदना पाटील, प्रदीप खिस्ते, सुनील परदेशी, राजेंद्र पिंगळे, पूर्वा ठाकूर आदी उपस्थित होते.