कामोठे वसाहतीत बायोमेडिकलचा खच
By admin | Published: January 11, 2017 06:30 AM2017-01-11T06:30:38+5:302017-01-11T06:30:38+5:30
कामोठे वसाहतीत सेक्टर १७ मलनि:सारण केंद्राजवळील मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीने
कळंबोली : कामोठे वसाहतीत सेक्टर १७ मलनि:सारण केंद्राजवळील मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीने मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल कचरा टाकला आहे. त्यामध्ये सिरिंज, इंजेक्शन, ब्लड टेस्टिंग ट्यूबबरोबर ब्लेडचा खच पडला आहे. या प्रकारामुळे रहिवासी चिंतेत आहेत.
कामोठे शहरात मोठ्या प्रमाणात दवाखाने, रुग्णालये, औषधालये, लॅब आहेत. या ठिकाणी निर्माण होणारा बायोमेडिकल कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने मुंबई वेस्ट मॅनेजमेट या संस्थेची नियुक्ती केली आहे. मात्र, कचरा उचलण्यासाठी शुल्क लागत असल्याने काही रुग्णालये, डॉक्टर व लॅब चालवणाऱ्यांकडून हा औषधी कचरा उघड्यावर टाकला जातो. औषधविक्रेत्यांकडूनही मुदत संपलेली औषधे कुठेही टाकण्यात येतात.
कामोठे टोलनाक्याजवळ गोळ्या, लिक्विड, लोशन, लहान मुलांची औषधे टाकून देण्यात आली होती. ही औषधे मुदत संपल्यामुळे वापरासाठी अयोग्य झाल्याने ती संबंधितांनी टाकली होती. यापूर्वी मानसरोवरकडे जाणाऱ्या रोडलगतच्या मोकळ्या भूखंडावर अशाच प्रकारे औषध डम्प करण्यात आली होती. त्याचबाबत आजूबाजूच्या रहिवाशांनी सिडकोकडे तक्र ारी केल्या. त्यामुळे हे औषध त्वरित उचलण्यात आली. मात्र, संबंधित औषध टाकणाऱ्यांचा शोध मात्र अद्याप लागलेला नाही. ब्लेडसारखा घातक कचरा उघड्यावर टाकला जात आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने येथील रहिवासी गोविंद साबळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.