नवी मुंबई : मागील काही महिन्यांत प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेली बहुतांश कामे अर्धवट स्थितीत सोडण्यात आलेली आहेत. त्यात रेलिंग बसवण्याच्या कामांसह पदपथांच्या कामांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ही कामे अर्धवट स्थितीतच सोडून देण्यात आलेली असल्याने, त्यावर झालेला खर्च यंदाच्या पावसाळ्यात पाण्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालिकेच्या वतीने मागील काही महिन्यांत प्रत्येक नोडमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. त्यामध्ये पदपथ दुरुस्तीसह रस्त्यालगत रेलिंग बसवण्याच्या कामांचा सर्वाधिक समावेश आहे. या कामांवर प्रभागनिहाय लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. मात्र, त्यापैकी बहुतांश कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, केवळ ठेकेदारांच्या घशात निधी घालण्यासाठी कामे काढली का? अशीही शंका निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी रेलिंग बसवल्यानंतर त्याखालील जागेत सिमेंटचा भरणा करून पाया भक्कम करण्यात आलेला नाही. त्याऐवजी मातीचा भराव टाकून थुकपट्टी लावण्याची कामे झाली आहेत. यामुळे बहुतांश ठिकाणचे रेलिंग एका बाजूला झुकले असून ते दोन ते तीन महिन्यांतच कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यापैकी काही ठिकाणी महावितरणने खोदकाम करून तिथल्या समस्येत अधिकच भर टाकली आहे. घणसोली सेक्टर १५ येथे गॅसच्या पाइपसाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर खोदकामाच्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करणे आवश्यक असतानाही ते करण्यात आलेले नाही. केवळ खडी व मातीचा भराव टाकून बुजवण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावर खोलगट भाग तयार झाला असून पावसाळ्यात त्या ठिकाणी पाणी साचल्यास खडी वाहून जाऊ शकते; परंतु या संदर्भात संबंधितांकडे तक्रार करूनही खोदकामाच्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करण्यास टाळाटाळ होताना दिसत आहे. मात्र, अशा प्रकारच्या अर्धवट स्थितीत सोडण्यात आलेल्या कामांमुळे त्यावर खर्च करण्यात आलेला लाखोंचा निधी पावसाच्या पाण्यात जाण्याची परिस्थिती आहे.