पनवेल : सायन-पनवेल महामार्गाजवळ कोपरा गावाजवळील उड्डाणपुलाजवळ मोठ्या प्रमाणात महत्त्वाच्या कागदपत्रांचा खच बुधवारी पडल्याचे आढळले. यात आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, आमदारांचे शिफारस पत्र आदी महत्त्वपूर्ण कागदपत्रांचा समावेश असल्याने बघ्याची गर्दी परिसरात जमली होती. याप्रकाराची माहिती मिळताच, खारघर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित कागदपत्रे गोळा करण्यास सुरु वात झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेली कागदपत्रे उचलण्यासाठी जवळपास तासभराचा कालावधी लागला. ठाणे, मुंबई, नवी मुंबईमधील घणसोलीमधील हे कागदपत्र होते. यात ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांचे शिफारसपत्र असल्याचे लक्षात आले. रात्रभर ही कागदपत्रे रस्त्यावर पडलेली होती. रात्री उशिरा एनपीएचटी या शासकीय कागदपत्रे वाहून नेणाऱ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी खारघर पोलीस ठाणे गाठून कागदपत्रे आपल्याच वाहनातून पडल्याचे सांगितले. त्यानंतर खारघर पोलिसांनी योग्य शहानिशा केल्यावर याबाबतचा संभ्रम थांबला. ठाणे येथील कार्यालयातून ही महत्त्वाची कागदपत्रे पेण येथे नेण्यात येत होती. खारघर येथील कोपरा परिसरात ती वाहनातून पडल्याची माहिती एजन्सीचे कर्मचारी किरण धातारा यांनी दिली. दोन ते तीस तास उटलून गेल्यानंतर संबंधित घटनेची माहिती कागदपत्र वाहून नेणाऱ्या गाडीतील कर्मचाऱ्यांना मिळाल्याने तोपर्यंत कागदपत्रांमुळे खारघरमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. सध्या राज्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांचे वारे आहे. लवकरच पनवेल महापालिकेच्याही निवडणुका होणार आहे. त्या पार्श्वभूमीमुळे या कागदपत्रांबद्दल अनेक शंका उपस्थित होत होत्या. मात्र संबंधित कागदपत्रे वाहून नेणाऱ्या एजन्सीने याबाबत खुलासा दिल्यानंतर विविध अफवांना पूर्णविराम मिळाले.
सायन-पनवेल महामार्गावर महत्त्वाच्या कागदपत्रांचा खच
By admin | Published: February 10, 2017 4:37 AM