पाम बीच मार्गावर मायक्रो सर्फेसिंगचा प्रयोग फसला? रस्ता झाला खड्डेमय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 03:25 AM2019-08-15T03:25:10+5:302019-08-15T03:25:20+5:30
नवी मुंबई शहरातील पाम बीच मार्गाची गेल्या वर्षी मायक्रो सर्फेसिंग या अत्याधुनिक तंत्र प्रणालीचा वापर करून दुरु स्ती करण्यात आली आहे.
नवी मुंबई : शहरातील पाम बीच मार्गाची गेल्या वर्षी मायक्रो सर्फेसिंग या अत्याधुनिक तंत्र प्रणालीचा वापर करून दुरु स्ती करण्यात आली आहे. या प्रणालीच्या वापरानंतर अवघ्या वर्षभरात पाम बीच मार्ग ठिकठिकाणी खडबडीत झाला असून, खड्डेही पडले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या मायक्रो सर्फेसिंगचा प्रयोग फसला की काय? असा सवाल व्यक्त होत आहे.
सिडकोने निर्मिती केलेल्या पाम बीच या मार्गाचे हस्तांतर २००७ साली पालिकेकडे केले आहे. २००७ साली हस्तांतराच्या वेळी या मार्गावर डांबरीकरण करण्यात आले होते, यासाठी सिडकोने जवळपास १४ कोटी रु पये खर्च केले होते. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. तसेच रस्त्यावरील डांबर ठिकठिकाणी उखडल्यामुळे रस्ता खडबडीत झाला होता. या रस्त्याला पुन्हा डांबरीकरण करण्यासाठी ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च असल्याने तसेच या कामासाठी लागणारा वेळ यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होणार होती. पैशाची, वेळेची बचत करण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षी पाम बीच मार्गावर मायक्रो सर्फेसिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या अत्याधुनिक तंत्रप्रणालीसाठी सुमारे नऊ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या प्रणालीमध्ये रस्त्याचे खोदकाम न करता जुन्या रस्त्यावरच डांबरीकरण, रस्त्याची उंचीदेखील जास्त वाढत नाही. रस्त्यावर मशिनच्या दाबामुळे जुना रस्ताही भरून निघतो. प्रदूषण होत नाही अशा विविध उल्लेखनीय बाबी असल्याने या तंत्रप्रणालीचा वापर करून मार्गाची दुरु स्ती करण्यात आली होती. या मार्गाच्या कामानंतर रस्त्याला किमान सात वर्षे कोणतीही अडचण येणार नाही, असे सांगण्यात आले होते; परंतु काम झाल्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या पावसातदेखील मार्गावर खड्डे पडले होते. या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. या वर्षीही अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, रस्ता खडबडीत झाला आहे. पाम बीच मार्गावर नेरु ळ जंक्शन येथील वाशीकडे जाणाऱ्या आणि येणाºया अशा दोन्ही मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच ठिकठिकाणी रस्ता खडबडीतही झाला आहे. महापालिकेने शहरात पहिल्यांदाच राबविलेला मायक्रो सर्फेसिंग या अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा प्रयोग फसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.