नवी मुंबई : गेल्या वर्षी काढण्यात आलेल्या महागृहनिर्माण योजनेतील यशस्वी अर्जदारांना घराचा पहिला हप्ता भरण्यासाठी सिडकोने २४ ऑक्टोबरची अंतिम मुदत दिली आहे; परंतु विधानसभा निवडणुकाची धामधूम यातच दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण आल्याने हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
सिडकोच्या सोडतीत यशस्वी ठरलेल्या ग्राहकांना निवारा या त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून सदनिकांचे विवरणपत्र देण्यात आले. त्यानुसार घरांचे पैसे भरण्यासाठी ग्राहकांना पाच टप्पे विभागून देण्यात आले आहेत. जून २०२० पर्यंत ग्राहकांना घराचे सर्व हप्ते भरायचे आहेत. त्यापैकी साडेचार लाख रुपयांचा पहिला हप्ता भरण्यासाठी २४ आॅक्टोबरची मुदत देण्यात आली आहे; परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने कर्जासाठी बँकाकडून परवड झाल्याचे अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत. यातच दसरा आणिदिवाळी सण आल्याने सर्वसामान्य ग्राहकांची हप्ते भरताना दमछाक होत आहे.
पहिल्या हप्त्याच्या रकमेची जुळवाजुळव करताना अनेकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पैसे भरण्याच्या मुदतीत वाढ करावी, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. असे असले तरी या प्रक्रियेत नियमाप्रमाणे कोणतीही मुदतवाढ देणे शक्य नसल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुळात पैसे भरण्याची मुदत टळली तरी घरांचे अॅलॉटमेंट रद्द होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण मुदतीनंतर विलंब शुल्कासह पैसे भरण्यासाठी १८० दिवसांची मुदत नियमाने दिली जाते. त्यामुळे संबंधित ग्राहकांना पुढील सहा महिन्यांत हप्त्यांची रक्कम भरणे शक्य असल्याचे सिडकोच्या पणन विभागाचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत डावरे यांनी स्पष्ट केले आहे.
यशस्वी अर्जदारांना घराचे ताबापत्र देताना विविध देयकांसह हप्ते भरण्याचे वेळापत्रक त्यात नमूद करण्यात आलेले असते. शिवाय, निर्धारित मुदतीत हप्ते भरू न शकणाऱ्या ग्राहकांना विलंब शुल्कासह पैसे भरण्याची मुभा असल्याचे यात नमूद केलेले आहे. मात्र, अनेक ग्राहक ताबापत्रातील तरतुदी वाचत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात संभ्रम निर्माण होत असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.