स्फोटाने हादरला ट्रक टर्मिनल परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:26 AM2017-12-08T01:26:50+5:302017-12-08T01:27:07+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील ट्रक टर्मिनल जवळील वाहतूकदाराच्या कार्यालयात बुधवारी रात्री केमिकलच्या ड्रमचा स्फोट झाला
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील ट्रक टर्मिनल जवळील वाहतूकदाराच्या कार्यालयात बुधवारी रात्री केमिकलच्या ड्रमचा स्फोट झाला. यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. २४ तासांनंतरही ड्रममध्ये कोणते केमिकल आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही. येथील ओमकार ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये व बाहेरील आवारामध्ये जवळपास १४ केमिकलचे ड्रम ठेवण्यात आले आहेत. बुधवारी रात्री येथे स्फोट झाला व केमिकलचा ड्रम उडून गाडीवर पडला. येथील कुस्तीच्या आखाड्याच्या छपरावरही ड्रमचे काही तुकडे पडले. स्फोटाच्या आवाजामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्फोटानंतर येथील नागरिकांच्या डोळ्याची आग होवू लागली.
उग्र वासही परिसरात पसरला होता. या परिसरामध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. स्फोटाचे वृत्त समजताच वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. ड्रममध्ये कोणते केमिकल आहे याविषयी माहिती येथील ट्रान्सपोर्ट कंपनीमधील कोणाकडेही नाही. केमिकलचा मालकही घटनास्थळी आला नसल्याने गुरूवारी सायंकाळपर्यंत याविषयी तपशील उपलब्ध होवू शकला नाही. खबरदारी म्हणून अग्निशमन दलाने एक गाडी घटनास्थळी ठेवली आहे. घटनास्थळाकडे येण्यासाठी नागरिकांना मज्जाव केला आहे. ट्रक टर्मिनल परिसरातील ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या कंपनीमध्ये केमिकलचा साठा ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही. केमिकल हाताळण्याच्या सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. केमिकलचे ड्रम ठेवताना अपघात होवू नये यासाठी कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही. या प्रकरणी केमिकल हाताळणी नियमांचे उल्लंघन झाले आहे का याची चौकशी करण्यात यावी व जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
ट्रक टर्मिनलजवळ झालेल्या स्फोटानंतर या परिसराच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ट्रक टर्मिनल, एपीएमसी पोलीस स्टेशन परिसर व बाजार समितीच्या चारही बाजूला ट्रान्सपोर्ट कंपन्यांची कार्यालये व गोडावून आहेत. देशभरातून विविध प्रकारचा माल नवी मुंबईमध्ये आणला जातो व येथून तो देशाच्या इतर भागांमध्ये पाठविण्यात येत असतो. ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या कार्यालयात व गोडावूनमध्ये ठेवण्यात येणाºया मालाचा तपशील ठेवला जात नाही. केमिकलचा साठा या कार्यालयांमध्ये करता येत नाही. नियम धाब्यावर बसवून ज्वलनशील पदार्थांची साठवणूक केली जात असल्यामुळेच बुधवारचा स्फोट झाला आहे. याप्रकरणी पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
अग्निशमनची परवानगीही नाही
ट्रान्सपोर्ट कंपन्यांची कार्यालये व गोडावूनमध्ये अग्निशमन नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. आग विझविण्यासाठीची काहीही उपाययोजना केलेली नसते. विशेष म्हणजे नियम तोडणाºयांवर अग्निशमन दलाचे अधिकारीही काहीही कारवाई करत नाहीत.
अग्निशमनच्या दुर्लक्षामुळेच ज्वलनशील पदार्थांचा साठा केला जात असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.