लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गात प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवा टेकडीच्या सपाटीकरणाला सुुरुवात करण्यात आली आहे. टेकडीच्या खडकात सुरुंग पेरून स्फोट घडविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १३00 सुरुंग पेरले जाणार आहेत. बुधवारी टेकडीवर स्फोटाचा ट्रायल घेण्यात आला. स्फोटाची ही चाचणी यशस्वी झाल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार सिडकोने विमानतळपूर्व कामे हाती घेतली आहेत. यात उलवे टेकडीची उंची कमी करणे, गाढी नदीचा प्रवाह बदलणे, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदी प्रमुख कामांचा समावेश आहे. तब्बल दोन हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहेत. यात उलवे टेकडीच्या सपाटीकरणाचे काम अत्यंत जोखमीचे व तितकेच महत्त्वाचे आहे. या टेकडीची उंची ९५ मीटर इतकी आहे. विमानतळासाठी ती ८६ मीटर इतकी कमी केली जाणार आहे. त्यासाठी स्फोटकांचा वापर केला जाणार आहे. झारखंड येथील सीआयएमएफआर या तज्ज्ञ संस्थेच्या देखरेखीखाली टेकडी कापण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार गेल्या शुक्रवारपासून टेकडीवर सुरुंग पेरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास १३00 सुरुंग पेरले जाणार आहेत. बुधवारी अंतराअंतराने १२ स्फोट घडवून या कामाची चाचणी घेण्यात आाली. ही चाचणी यशस्वी झाल्याने आता सुरुंग पेरण्याच्या कामाला गती दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील सुरुंग पेरण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर स्फोट घडवून टेकडीचे उत्खनन केले जाणार आहे. साधारण पुढील आठवड्यात प्रत्यक्ष स्फोट घडविला जाईल, अशी माहिती सिडकोच्या संबंधित विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, उलवा टेकडीची उंची कमी करण्यासह इतर प्रकल्पपूर्व कामे सुरू करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळाला गती मिळाली आहे.
उलवे टेकडीवर स्फोटाचा ट्रायल
By admin | Published: June 22, 2017 12:33 AM