अनैतिक संबंधाला विरोध केल्याने हत्या केल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 02:22 AM2018-05-22T02:22:44+5:302018-05-22T02:22:44+5:30

तीन आरोपींना अटक : मुख्य आरोपी चित्रपट सृष्टीत कार्यरत

Exposed to protest against immoral relations | अनैतिक संबंधाला विरोध केल्याने हत्या केल्याचे उघड

अनैतिक संबंधाला विरोध केल्याने हत्या केल्याचे उघड

Next

पनवेल : देहरंग धरणाजवळ झालेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे पत्नीच्या प्रियकराने त्याच्या साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. यामधील मुख्य आरोपीवर यापूर्वी विनयभंगाचाही गुन्हा दाखल असून मराठी व भोजपुरी चित्रपटांना अर्थसाहाय्य करण्याचे कामही तो करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये नहुशकुमार कोळी (३७), धरमवीर बिजेंद्र सिंग (२४), नरेंद्रसिंग बदलूसिंग परिहार (५४) यांचा समावेश आहे. देहरंग धरणाजवळ २८ एप्रिलला एक तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृताच्या डोक्यावर व पाठीवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पुणे येरवडा येथील पोलीस स्टेशनमध्ये ३ मे रोजी मिसिंगची तक्र ार दाखल करण्यात आली होती. मयताचा भाऊ अनिकेत आरणे याने आपल्या भावाचा मृतदेह ओळखला. त्याचे नाव ओंकार कुंदन आरणे (२१) असे सांगितले. मयत ओंकार हा अ‍ॅमझोनमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मयत ओंकार आरणे व त्याची पत्नी सुधा आरणे या मागील महिन्यात तिच्या मावशीचा नवरा नहुशकुमार कोळी (रा.कोंबडभुजे, पनवेल) यांच्याकडे गेले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सखोल चौकशी केली असता मयताची पत्नी दोन दिवसांपासून पतीशी संपर्कात नसल्याचे समजले.
यासंदर्भात पोलिसांनी नहुशकुमार कोळी यास अधिक चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याचे मयताच्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याचे सांगितले. ही गोष्ट मयत ओंकार आरणे याला माहिती झाल्यामुळे नहुशकुमारला वेळोवेळी जाब विचारत होता. नहुशकुमार व मृत ओंकारच्या पत्नीचे अनैतिक संबंध नहुशकुमारच्या पत्नीला समजल्यामुळे ती जानेवारी २0१८ मध्येच नहुशकुमारला सोडून गेली आहे. त्यामुळे नहुशकुमार याने त्याचे दोन अंगरक्षकांपैकी एक नरेंद्र परिहार याचे सिक्सर हे अग्निशस्त्र घेऊन त्याने दुसरा अंगरक्षक धरमवीरसिंग याच्याशी संगनमत करून त्याला सोबत घेऊन मयत ओंकारला तो राहत असलेल्या उलवे, सेक्टर-२१ येथील घरातून बोलावून घेतले. त्याला बाहेर फिरायला जाण्याचा बहाणा करून गाडीतून नेरे परिसरात घेऊन जाऊन लघुशंकेसाठी देहरंग धरणाजवळ थांबले असताना आरोपी धरमवीर सिंग याने ओंकारच्या डोक्यात व पाठीत अग्निशस्त्राने फायरिंग करून त्याला ठार मारले व त्यानंतर त्याचे प्रेत उचलून रस्त्याच्या बाजूच्या झाडीत टाकून दोघे पळून गेले. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना अटक केली आहे.

कौशल्याने केला तपास
गोळी झाडून हत्या केल्यानंतर आरोपींनी सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कसून तपास करून या गुन्ह्याचा तपास केला आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभय महाजन, सपोनि बबन आव्हाड, अजित झांजुर्णे, महेश माने, पोलीस उपनिरीक्षक सुनील गुरव, नीरज पाटील व इतरांचा सहभाग होता.

आरोपीचा चित्रपटसृष्टीशी संबंध
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नहुशकुमार कोळी हा कोंबडभुजे गावातील रहिवासी असून तो कोळी प्रॉडक्शन चालवतो. त्याने यापूर्वी मराठी चित्रपट काढलेले असून हिंदी व भोजपुरी चित्रपटांना आर्थिक पुरवठा केलेला आहे. आरोपी नहुशकुमार याच्याविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Exposed to protest against immoral relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा