नवी मुंबई : देशाच्या पंतप्रधांना स्वतःच्या राज्याबद्दल भाषेबद्दल असलेले प्रेम लपवता येत नाही, मग तुम्ही का लपवताय असा टोला मारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात मराठीलाच टिकवण्यासाठी धडपड करावी लागत असल्याची खंत व्यक्त केली. महाराष्ट्र मंडळाकडून अमेरिकेत शंभरहून अधिक मराठी शाळा चालवल्या जात असल्या तरीही, सर्वप्रथम राज्यात लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्र शासनातर्फे वाशीत आयोजित विश्व मराठी संमेलनासाठी ते रविवारी उपस्थित होते.
शासनातर्फे वाशी येथे तीन दिवसीय विश्व मराठी संमेलन भरवण्यात आले आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी राज्यात मराठी शाळा बंद होत असताना महाराष्ट्र मंडळ अमेरिकेत सुमारे १०० मराठी शाळा चालवत असल्याचे गौरव उदगार राज ठाकरे यांनी काढले. मात्र अगोदर महाराष्ट्रात लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधांना स्वतःच्या राज्याबद्दल, स्वतःच्या भाषेबद्दलचे प्रेम लपवता येत नाही. तर तुम्ही आम्ही ते का लपवतोय असाही प्रश्न त्यांनी उपस्थितांना व्यक्त केला. मराठी भाषा हि उत्तम असतानाही ती संपवण्याचा राजकीय प्रयत्न होत असल्याचे बघून तळपायाची आग मस्तकात जात असल्याचे बोलत यांनी आपला रोष व्यक्त केला.
तर हिंदी हि आपली राष्ट्रभाषा नसून इतर भाषांप्रमाणेच एक भाषा असून केवळ केंद्र आणि राज्ये यांच्यात समन्वयाची वापरली जाते. तर कोणत्याच भाषेची राष्ट्रभाषा म्हणून निवड झालेली नाही. परंतु आपण मात्र गोट्यासारखे दुसऱ्या भाषेकडे घरंगळत जात असल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या वर्षांपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा केला असल्याचे सांगितले. तसेच उच्च आणि तांत्रिक शिक्षण देखील मराठीत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर - म्हैसकर ह्या देखील उपस्थित होत्या.
पाहुण्याच्या घरी असल्याने उद्धार करणे टाळतोय
मराठी भाषेच्या प्रसाराबद्द्दल शासनाची असलेल्या उदासीनतेबद्दल खंत व्यक्त करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शासनाने मराठी भाषेवर उपकार करावेत असा टोला मारला. परंतु शासकीय कार्यक्रम असल्याने आवरते घेत व पाहुण्यांच्या घरी जाऊन त्यांचाच उद्धार करणे बरे नसल्याचे म्हणत त्यांनी आपली खंत व्यक्त केली.