अश्विनी बिंद्रे खटल्याच्या निकालासाठी मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 02:13 AM2020-10-02T02:13:14+5:302020-10-02T02:13:21+5:30
कामकाजासाठी एक वर्ष; आनंद बिंद्रे यांची साक्ष पूर्ण; आरोपींच्या अडचणी वाढल्या
पनवेल : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्याकांडातील आरोपी राजेश पाटीलने जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळला जाण्याच्या भीतीने अचानक काढून घेतला आहे. त्यामुळे या हत्येच्या खटल्यातील आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, या खटल्याचे कामकाज पूर्ण करण्यासाठी आणखी एक वर्षाची मुदतवाढ मुंबई उच्च न्यायालयाने पनवेल सत्र न्यायालयाला दिली आहे.
अश्विनी बिंद्रे हत्याकांडामध्ये बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरूंदकर, राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर हे आरोपी आहेत. या खटल्यातील साक्षीदारांची ओळख परेड आणि उलट तपासणी पनवेल सत्र न्यायालयाने गेल्या वर्षी सुरू केली होती. मुख्य साक्षीदार अश्विनी यांचे भाऊ आनंद बिंद्रे यांची साक्ष पूर्ण झाली असून, पती राजू गोरे यांची उलट तपासणी सुरू आहे. या खटल्याचे कामकाज आॅक्टोबरपर्यंत संपविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र कोरोनामुळे पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजी
खटल्यातील प्रमुख आरोपी राजेश पाटीलने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे, ही माहिती सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांना देण्यात आली नाही. २७ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता याबाबत त्यांना कळविण्यात आले. यावरून पोलीस यंत्रणा आजही अभय कुरूंदकर आणि अन्य आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असा आरोप अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी करून पोलिसांच्या या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.