लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : खासगी इंग्रजी, मराठी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांतील २५ टक्के आरक्षित जागांसाठी रायगड जिल्हा व पनवेल तालुक्यात आॅनलाइन मोफत प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. रायगड जिल्ह्यातील २८३ तर पनवेल तालुक्यासाठी ८४ पात्र शाळेत आॅनलाइन प्रवेश प्रक्रि याही पूर्ण झाली असून, यासाठी पाच फेऱ्याही पूर्ण झाल्या आहेत. पनवेल तालुक्यातील शाळेत ७५६ जागा शिल्लक राहिल्या आहेत. या रिक्त जागांसाठी २५ टक्के प्रवेशाकरिता २२ जून ते ३० जूनपर्यंत आॅनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. ७५0पेक्षा जास्त जागा शिल्लक असल्याने पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत आता वंचित, आर्थिक दुर्बल घटक आणि अपंग विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के या प्रमाणात मोफत प्रवेश दिला जात आहे. पनवेल तालुक्यातील १६ खासगी शाळांमध्ये बालकांना थेट प्रवेश मिळण्यास मोठी मदत होत आहे. खासगी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे शैक्षणिक शुल्क मोठ्या प्रमाणात आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असलेले पालक आपल्या पाल्यांना अशा शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकत नव्हते. त्यामुळे शासनाने ‘आरटीई’अंतर्गत वंचित घटक (एससी, एसटी), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अपंगांसाठी अशा शाळांमध्ये मोफत प्रवेश देणे बंधनकारक केले. पनवेल तालुका गटशिक्षण अधिकारी कार्यालयाकडून गेल्या दोन वर्षांपासून प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. यासाठी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी शाळेत प्रवेशासाठी ७५६ जागा शिल्लक असल्याने ३० जूनपर्यंत आॅनलाइन अर्ज भरू शकता, असे पनवेलचे गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी सांगितले.
आरटीईअंतर्गत आॅनलाइन प्रवेशासाठी मुदतवाढ
By admin | Published: June 23, 2017 6:07 AM