पनवेल स्थानकाचा विस्तार रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 11:54 PM2020-02-20T23:54:49+5:302020-02-20T23:55:05+5:30
सिडको, मध्य रेल्वेचा संयुक्त प्रकल्प : झोपड्यांच्या पुनर्वसनाचा तिढा
कमलाकर कांबळे
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल शहराला वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे. विशेषत: पनवेल रेल्वे स्थानक विकासाच्या केंद्रस्थानी असणार आहे. ही बाब ओळखून या स्थानकाचा विस्तार करण्याचा निर्णय सिडको आणि मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यासंबंधीचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. मात्र स्थानकाच्या विस्तारित क्षेत्रातील झोपड्यांचे पुनर्वसन आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे या प्रकल्पाचे काम रखडल्याचे सांगितले जात आहे.
पनवेल स्थानक मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावर आहे. कोकण मार्गे जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकात थांबतात. मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस तसेच विदर्भ, मराठवड्यात जाणाºया सर्व गाड्यांना या स्थानकात थांबा आहे. या स्थानकात एकूण सात फलाट असून, त्यापैकी चार उपनगरीय तर तीन लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी आहेत. यात आणखी तीन फलाटांची वाढ करून सोयीसुविधांचा विस्तार करण्याची योजना आहे. भविष्यात या स्थानकावर ताण वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काळाची गरज म्हणून पनवेल स्थानकाचा मेकओव्हर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसा प्रस्ताव मध्य रेल्वेला सादर करण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या मान्यतेनंतर स्थानकाच्या विस्तारीकरणाचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. सीएसएमटीच्या पार्श्वभूमीवर या स्थानकाचा विकास करण्याची योजना आहे.
पनवेल स्थानक परिसरात सुमारे ८५0 झोपड्या आहेत. या झोपड्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सिडको व मध्य रेल्वेने संयुक्त अहवाल तयार केला आहे. पुनर्वसनासाठी एमएमआरडीएच्या रेंटल हाउसिंग योजनेतील घरे मिळवून देण्याची तयारी सिडकोने दर्शविली आहे. परंतु त्याचा संपूर्ण खर्च रेल्वेने उचलावा असा सिडकोचा प्रस्ताव आहे. त्यावर निर्णय होत नसल्याने स्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम रखडल्याची माहिती सूत्राने दिली.
सीएसएमटी-पनवेल कॉरिडोरचा प्रस्ताव
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण यंत्रणा सक्षम करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. मुंबईहून नवी मुंबई विमानतळापर्यंत कमीतकमी वेळेत पोहोचता यावे यादृष्टीने मेट्रो, रेल्वे, रस्ते व जलवाहतुकीचे जाळे विणले जात आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल स्थानकापर्यंत कॉरिडोर तयार केला जाणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून पनवेल स्थानकाचा सीएसएमटीच्या धरतीवर मेकओव्हर करण्याची योजना आहे.