सिडकोच्या घरांचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 01:08 AM2020-06-25T01:08:12+5:302020-06-25T01:08:16+5:30
या गृहप्रकल्पातील जवळपास पंधरा हजार ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
नवी मुुंबई : सिडकोच्या महानिर्माण प्रकल्पातील यशस्वी ग्राहकांना घराचे हप्ते भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या गृहप्रकल्पातील जवळपास पंधरा हजार ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी ३0 जून ही अंतिम मुदत देण्यात आली होती, परंतु ग्राहकांनी ही मुदत वाढवून मिळण्याची विनंती सिडको व राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी हा निर्णय जाहीर केला आहे. कोरोना महामारीमुळे मागील दोन ते अडीच महिने लॉकडाऊन सुरू होता. या काळात लाभार्थ्यांनी गृहकर्जासाठी बँकांकडे केलेल्या अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे त्यांना कर्ज मिळालेले नाही. अनेकांच्या नोकऱ्या आणि रोजगार गेले आहेत. अनेकांच्या वेतनात कपात झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत दिलेल्या मुदतीत हप्ते भरणे शक्य नाही. यापार्श्वभूमीवर घराचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, यासाठी ग्राहकांचे विविध स्तरांवर प्रयत्न सुरू होते. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून, राज्य सरकारने घराचे हप्ते भरण्यासाठी ३0 सप्टेंबर २0२0 पर्यंतची मुदत दिली आहे.