मालमत्ता कर अभय योजनेला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 12:31 AM2021-03-03T00:31:38+5:302021-03-03T00:31:42+5:30
पालिकेचा निर्णय : १५ डिसेंबरपासून ११२ कोटींचा महसूल जमा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मालमत्ता कर थकबाकी वसूल करण्यासाठी महानगरपालिकेने १५ डिसेंबरपासून अभय योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे १ मार्चपर्यंत ११२ कोटी ३२ लाख रुपये महसूल जमा झाला आहे. नागरिकांना ६० कोटी १० लाख रुपयांची सूट देण्यात आली आहे. सर्व मालमत्ताधारकांना लाभ घेता यावा यासाठी योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. कोरोना काळात अनेक नागरिकांना रोजगार गमवावा लागला. उत्पन्नावरही परिणाम झाला. यामुळे अनेकांना मालमत्ता कर भरता आला नाही. महापालिकेची थकबाकी वाढू लागली. थकबाकी कमी करण्यासाठी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिकेने १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारीदरम्यान अभय योजना जाहीर केली होती. दंडाच्या रकमेमध्ये ७५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १५ फेब्रुवारीला अभय योजनेची मुदत संपल्यानंतर पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. आता ही मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविली आहे. १५ मार्चपर्यंत मूळ रक्कम व २५ टक्के दंड भरल्यानंतर पुढील ७५ टक्के दंड माफ केला जाणार आहे. १६ ते ३१ मार्चदरम्यान दंड रकमेवर ५० टक्के सवलत राहणार आहे. महानगरपालिकेने अभय योजना जाहीर केल्यापासून १ मार्चपर्यंत ११२ कोटी ३२ लाख एवढी रक्कम जमा झाली आहे. नागरिकांना ६० कोटी १० लाख रुपये सूट मिळाली आहे. यामुळे एकूण मनपाची १७२ कोटी ४२ लाख रुपये थकबाकी कमी झाली आहे. आर्थिक वर्षात आतापर्यंत ४४० कोटी रुपये मालमत्ता कर जमा झाला आहे. आर्थिक वर्ष संपेपर्यंत जास्तीतजास्त कर वसूल करण्यासाठी महानगरपालिकेचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनीही अभय योजनेचा
लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.