महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कवच योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 12:44 AM2020-10-19T00:44:00+5:302020-10-19T00:44:15+5:30
कोविड विषाणूच्या सार्वत्रिक साथीच्या अनुषंगाने सर्वेक्षण, शोध, प्रतिबंध, चाचणी, उपचार, मदत कार्य आदी प्रकारांची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मृत्युप्रकरणी ५० लाख रुपये विशेष सानुग्रह साहाय्याची योजना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानी राबविण्याची सूचना शासनाने ४ जून रोजी दिली होती.
नवी मुंबई : कोविड १९ उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनेत काम करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा कवचाला शासन निर्णयानुसार ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिकेच्या कामगार कल्याण निधीमधून विशेष सानुग्रह साहाय्य म्हणून ५० लाख मदत देण्यात येणार आहे.
कोविड विषाणूच्या सार्वत्रिक साथीच्या अनुषंगाने सर्वेक्षण, शोध, प्रतिबंध, चाचणी, उपचार, मदत कार्य आदी प्रकारांची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मृत्युप्रकरणी ५० लाख रुपये विशेष सानुग्रह साहाय्याची योजना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानी राबविण्याची सूचना शासनाने ४ जून रोजी दिली होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, शासन निर्णय २९ मेनुसार योजनेची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. राज्यात सद्यस्थितीमध्ये कोविड १९ विषाणूंची साथ सुरू असल्याने, सानुग्रह साहाय्य लागू करण्याबाबतच्या योजनेस पुन्हा मुदतवाढ करण्याची सूचना शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यासाठी शासनाने १४ ऑक्टोबर रोजी परिपत्रक जारी केले असून, नवी मुंबई महापालिकेने ४ जून रोजीच्या परिपत्रकातील अटी-शर्थी कायम ठेवायच्या असून, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनेत काम करणाऱ्या महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कवच योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.