गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 11:31 PM2019-02-01T23:31:17+5:302019-02-01T23:31:42+5:30
बलात्काराच्या ४८ गुन्ह्यांमधील आरोप सिद्ध झाले नाहीत
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रात घडलेल्या १५३ बलात्कारांच्या गुन्ह्यापैकी ४८ गुन्हे लग्नाच्या आमिषाने झाले आहेत. या ४८ गुन्ह्यांचा न्यायालयात टिकाव लागला नसल्याने एकून गुन्ह्याच्या दोषसिद्धीचा टक्का घसरला आहे. यामुळे आपसातील वादातून दाखल होणाऱ्या बलात्काराच्या खोट्या तक्रारींचा परिणाम पोलिसांच्या तपासावर होत असल्याचे दिसून येत आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गतवर्षात १५३ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी १५१ गुन्ह्यांची उकल पोलिसांकडून झालेली आहे. त्यापैकी ३ गुन्हे नोकरीच्या आमिषाने, २२ गुन्हे शेजारच्या व्यक्तींकडून, १५ नातेवाइकांकडून तर ७ मित्रांकडून व ४८ गुन्हे लग्नाच्या आमिषाने घडले आहेत. तर ३ गुन्हे अनोळखी व्यक्तींकडून झालेले आहेत. २०१७ मध्ये एकूण १३१ गुन्हे घडले होते. त्यापैकी १२८ गुन्ह्यांची उकल झालेली आहे.
विनयभंगाच्या तक्रारीत देखील २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये ३० गुन्हे अधिक आहेत. पोलिसांकडील या नोंदीनुसार २०१७ च्या तुलनेत गतवर्षी बलात्काराच्या तक्रारी २२ ने वाढल्या आहेत. त्यामध्ये लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या तक्रारीवरून दाखल झालेले गुन्हे न्यायालयात टिकू शकलेले नसल्याचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले. यामुळे गुन्ह्याचा तपास करूनदेखील दोषसिद्धी न होऊ शकल्याचा परिणाम पोलिसांच्या तपासकामावर होत असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबईत आजवर घडलेल्या घटनांवरून काही राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणाºया व्यक्तींवर देखील अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये संबंधिताचीही बदनामी होत असून त्याचे दुरगामी परिणाम उमटतात.
एखाद्या महिला व पुरुष यांच्यात संमतीने शरीरसंबंध झाल्यानंतर कालांतराने त्यांच्यात वाद होताच महिलेकडून पुरुषाविरोधात बलात्काराची तक्रार केली जाते. मात्र, न्यायालयाच्या मते कधीकाळी संमतीने झालेले संबंध बलात्कार असू शकत नाहीत; परंतु मुलगी अल्पवयीन असल्यास तिला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध केल्यास तो मानला जातो. अशा गुन्ह्यातही दोषसिद्धीचे नवी मुंबई पोलिसांचे प्रमाण २४ टक्के आहे. त्यात वाढ करण्याच्या अनुषंगाने येत्या काळात तपासयंत्रणेवर भर दिला जाईल, असा विश्वास पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी व्यक्त केला आहे. अनेकदा तपास अधिकाºयाकडून योग्यरीत्या दोषारोपपत्र तयार न करणे, साक्षीदाराने साक्ष बदलणे, अशा प्रकारातून देखील संबंधित गुन्ह्यातील संशयित आरोपी सुटू शकतो.
प्रेमसंबंधातून महिला पुरुषामध्ये अनेकदा अनैतिक शरीरसंबंध घडतात. त्याकरिता पुरुषाकडून सदर महिला अथवा मुलीला लग्नाचे देखील आमिष दाखवले जाते. पुरुषाला अद्दल घडवण्याच्या उद्देशाने काही वेळा बलात्काराची तक्रार दिली जाते. तर काही प्रकरणात केवळ सूडबुद्धीच्या भावनेतून तरुणावर बलात्काराचे आरोप झाल्याचेही प्रकार घडतात.
पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षी लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचे ४८ गुन्हे घडले आहेत. मात्र, न्यायालयाच्या मते लग्नाचे आमिष दाखवून झालेले शरीरसंबंध हा बलात्काराचा गुन्हा होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे न्यायालयात टिकत नसल्याने त्याचा परिणाम बलात्कारांच्या एकूण गुन्ह्यांच्या दोषसिद्धीच्या आकडेवारीवर होत आहे.
- संजय कुमार, पोलीस आयुक्त