नवी मुंबई : उत्तेजक औषधे विक्रीच्या बहाण्याने अमेरिका, कॅनडा व इतर देशातील व्यक्तींना गंडा घालणारे दोन कॉलसेंटर पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. नेरूळमधील सेन्चुरियन मॉलमध्ये अवैधरित्या दोन्ही कॉलसेंटर चालत होते. त्याठिकाणावरून अमेरिका, कॅनडा व इतर देशातील नागरिकांना फोन करून ते त्याच देशातील सेल्समन असल्याचे भासवून उत्तेजकता वाढवणारी औषधे विक्रीच्या बहाण्याने त्यांच्या क्रेडिट, डेबिट कार्डची माहिती मिळवत होते. त्याद्वारे कार्डचा गैरवापर करून त्यांना गंडा घालत होते.
विदेशी नागरिकांना गंडा घालणारे दोन कॉलसेंटर नेरूळमध्ये चालत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे उपायुक्त अमित काळे, सहायक आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांनी पथक केले होते. त्यामध्ये सहायक निरीक्षक ईशान खरोडे, हर्षल कदम, श्रीनिवास तुंगेनवार, नितीन जगताप, नितीन परोडवार, प्रवीण किणगे आदींचा समावेश होता. त्यांनी शुक्रवारी मध्यरात्री सेंच्युरियन मॉलमधील व्ही केअर सोल्युशन कॉलसेंटवर छापा टाकला असता, तिथून इंटरनेटद्वारे कॅनडा, अमेरिका तसेच इतर देशात फोन केले जात असल्याचे उघड झाले. फोन करणाऱ्यांकडून ते त्याच देशातले सेल्समन असल्याचे सांगून विदेशी नागरिकांना उत्तेजकता वाढवणाऱ्या औषधांची माहिती द्यायचे. त्यानंतर एखाद्याने ते घेण्यास इच्छुकता दर्शवल्यास त्यांच्या कार्डची माहिती मिळवून त्याद्वारे पैसे हडप करायचे.
सदर कारवाईवेळी त्याठिकाणी अशाच प्रकारे अवैधरित्या दुसरे देखील कॉलसेंटर चालत असल्याचे समोर आले. यामुळे तिथल्या इसेम्बी कॉलसेंटरवर देखील पोलिसांनी छापा टाकला असता तिथे देखील असाच प्रकार सुरु असल्याचे उघड झाले. दोन्ही कॉलसेंटर प्रकरणी १३ जणांवर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरबाज खान, अभिकांत शर्मा, शुभम केदारे, रतिश मिश्रा, सार्थक इंगवले, पंकज निकम, प्रवीण बंगेरा, रेहान खान, आवेश शेख, कृष्णा मोरे, विक्रम नेगी, शरीफ बोरे व बिलाल आबदी अशी त्यांची नावे आहेत. अरबाज खान व शुभम केदारे यांच्याकडून हे दोन्ही कॉलसेंटर चालवले जात होते. अरबाज कोपर खैरणेचा राहणारा असून त्याने पोलिसांना चकमा दिला आहे. या कारवाईत दोन्ही ठिकाणावरून पोलिसांनी संगणक व हार्ड डिस्क असा ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय पुढील तपासासाठी तांत्रिक पुरावे देखील तज्ञामार्फत जमा केले आहेत. त्यांनी अद्याप पर्यंत किती विदेशी नागरिकांना गंडा घातला आहे याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.