उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांची पिळवणूक; कर्मचारी संघटनेचा आरोप
By नामदेव मोरे | Published: October 9, 2023 05:19 PM2023-10-09T17:19:49+5:302023-10-09T17:20:07+5:30
न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार
नवी मुंबई : उद्यान विभागातील कामगारांची पिळवणूक केली जात आहे. नियमापेक्षा कमी कामगारांची नियुक्ती केली आहे. सर्वांना किमान वेतन दिले जात नाही. नाकाकामगारांकडून कमी पैशांमध्ये कामे करून घेतली जात आहेत. उद्यान विभागातील कामकाजाची निष्पक्ष चौकशी करावी. गैरव्यवहार करणारांवर कारवाई करावी. आमचे आक्षेप व आरोप खोटे असतील तर आमच्यावर कारवाई करा असे आव्हानही समाज समता कामगार संघटनेने दिले आहे.
कामगारांच्या १४ प्रमुख मागण्यांसाठी समाज समता संघ संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य झाल्या नसल्यामुळे सहाव्या दिवशीही मनपा मुख्यालयासमोर कामगारांनी ठिय्या मांडला आहे. उद्यान विभागाच्या कामकाजावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. उद्यानाची देखभाल करण्यासाठी नियमाप्रमाणे आवश्यक कामगारांची नियुक्ती केलेली नाही. उपलब्ध कामगारांपैकी सर्वांना किमान वेतन नियमाप्रमाणे वेतन दिले जात नाही. काहींना किमान वेतन दिल जात आहे. नाका कामगारांकडून काम करून घेतले जात असून त्यांना किमान वेतन दिले जात नाही. कमी कामगारांकडून जास्त काम करून घेतले जात आहे. २०२० पासून राहणीमान भत्यातील थकीत रक्कम देण्यात आलेली नाही.
बोनस, रजेचा पगार, भविष्यनिर्वाह निधी, राज्य कामगार विमा योजनेची थकबाकी दिली जात नाही. उद्यान देखभालीच्या कामामध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोपही संघटनेचे अध्यख गजानन भोईर, सरचिटणीस मंगेल लाड यांनी केला आहे. जो पर्यंत कामगारांच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत व उद्यान विभागातील कामाची चौकशी होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.
आम्ही केलेल्या आरोपांची चौकशी करावी. आरोप सत्य असतील तर संबंधीत दोषींवर कारवाई करावी. आमचे आरोप खोटे असतील तर आमच्यावर कारवाई करावी.
मंगेश लाड, सरचिटणीस समाज समता कामगार संघ
उद्यान विभागातील सर्व कामगारांना किमान वेतन व सवलती मिळाल्या पाहिजे. अनेक कामगारांना किमान वेतन दिले जात नाही. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गजानन भोईर, अध्यक्ष - समाज समता कामगार संघ