केबल व्यवसायीकाला खंडणीसाठी धमकी; २० लाखाची मागणी, ११ जणांवर गुन्हा दाखल
By नामदेव मोरे | Published: September 28, 2022 06:35 PM2022-09-28T18:35:46+5:302022-09-28T18:36:17+5:30
२० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ११ जणांविरोधात एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : उलवे परिसरात इंटरनेट व टी. व्ही. केबलचा व्यवसाय करणाऱ्यास विकी देशमुख टोळीच्या गुंडांनी धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २० लाख रुपयांची खंडणी मागीतल्याप्रकरणी ११ जणांविरोधात एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये जितेंद्र देशमुख, अखिलेश यादव, यश गुप्ता, अंकीत गुप्ता, रेआन अग्रवाल, कदीर, इम्रान व इतर चार जणांचा समावेश आहे.
उलवे परिसरात डीवायज एसएसव्ही ब्रॉडबॅन्ड कंपनीच्या माध्यमातून टीव्ही व इंटरनेट सुविधा पुरविली जात आहे. या कंपनीमध्ये झोनल मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या तरूणाची जितेंद्र देशमुख साठी काम करणारा अखिलेश यादव ने १७ ऑगस्टला भेट घेतली. तुझ्यावर विकी भाई व जितु भाई नाराज आहेत. तुला २० लाख रुपये द्यासला सांगितले असून केबलच्या नफ्यातील १० टक्के वाटा देण्याची मागणी केली. खंडणी न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. विकी देशमुख तुरुंगात असला तरी बाहेर आमच्याकडे २ हजार पोर आहेत, तुला उचलून नेवू अशी धमकी दिली.
या प्रकरणी संबंधीताने एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.