पनवेलमध्ये पाणीटंचाईवर बोअरवेलचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 02:36 AM2018-05-17T02:36:33+5:302018-05-17T02:36:33+5:30

पनवेल शहर व ग्रामीण भागातील तीव्र पाणीटंचाईमुळे बोअरवेल घेण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. तालुक्यात ३०० ते ४०० फुटांपर्यंत चाचपणीचा प्रयत्न केला जात आहे.

Extraction of borewell on water shortage in Panvel | पनवेलमध्ये पाणीटंचाईवर बोअरवेलचा उतारा

पनवेलमध्ये पाणीटंचाईवर बोअरवेलचा उतारा

googlenewsNext

- मयूर तांबडे 
पनवेल : पनवेल शहर व ग्रामीण भागातील तीव्र पाणीटंचाईमुळे बोअरवेल घेण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. तालुक्यात ३०० ते ४०० फुटांपर्यंत चाचपणीचा प्रयत्न केला जात आहे. काही वर्षांपूर्वी अवघ्या ५० ते १०० फुटांवर लागणारे पाणी आता ३०० ते ४०० फुटांवरदेखील लागत नसल्याने भविष्यातील पाण्याच्या दृष्टीने ही बाब गंभीर झाली असून, विहिरी किंवा बोअरवेलमधील पाणीपातळी वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आव्हान समोर आहे.
तीव्र उन्हाळ्यामुळे पनवेल महापालिका कार्यक्षेत्रासह ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे बोअरवेलच्या मागणीमध्ये सुमारे २५ ते ३० टक्के वाढ झाली असून, बांधकाम व्यावसायिकांबरोबरच सोसायट्यांकडूनही मोठ्या प्रमाणात बोअरवेल खणण्यात येत आहेत. बोअरवेल घेण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. मात्र, त्या प्रमाणात पाण्याचे पुनर्भरण होत नाही. परिणामी, भूजल पातळी कमी होत चालली आहे. पाणी मिळवण्याच्या प्रयत्नात मोठ्या प्रमाणात बोअरवेल मारत आहेत. तालुक्यात भूगर्भातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावत चालली आहे. जमिनीतून पाणी मिळेल या आशेने नागरिक बोअरवेल खोदत आहेत; मात्र पाणी मिळण्याऐवजी ३०० ते ४०० फूट खोल बोअरवेलसाठी २० हजार ते ३० हजार रु पये खर्च होत आहेत. पूर्वी ५० ते १०० फुटांवर असणारी पाणीपातळी आता प्रचंड खालावल्यामुळे विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये बोअरवेलचा व्यवसाय तेजीत आहे. भूगर्भ विभागाच्या सूचनेनुसार २०० फुटांपेक्षा अधिक खोल बोअरसाठी परवानगी घ्यावी लागते; पण या सूचनेकडे सर्रास दुर्लक्ष करून खोलवर बोअर घेतले जात आहेत. पाणीपातळी खालावत चालली असल्याने जुन्या-नव्या बोअरवेल पुनर्भरणासाठी धडक कृती कार्यक्रम हाती घ्यावा लागेल. शास्त्रीय पद्धतीने पावसाचे पाणी पुन्हा जमिनीत सोडणारी यंत्रणा उभी करावी लागेल.
नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. पाण्याची ही गरज भागवण्यासाठी विहीर व बोअरवेल खोदण्यासाठी लाखो रुपये खर्ची घातले जात आहेत. या परिसरात खोदकामासाठी जणू काही चढाओढच चालली आहे.
>पाणाड्यांना मागणी वाढली
बोअरवेलची जागा निश्चित करण्यासाठी परिसरातील जमिनीतील पाणी शोधणारे पाणाडे येऊन पाण्याचे ठिकाण, जागा सांगत आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार नागरिक हजारो रुपये खर्चून बोअरवेल खोदत आहेत. पाणी असलेली जागा दाखविण्याची फी सुमारे दोन ते तीन हजार रुपये घेतली जात आहे. पाणाडे नारळ, लाकडी काठ्या, तवा फिरवून व विविध प्रकारच्या झाडांचा अंदाज घेत, पाणी सांगत आहेत; मात्र भूगर्भात पाणी नसल्याने नागरिकांच्या पदरी निराशा पडत आहे.

Web Title: Extraction of borewell on water shortage in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.