अभ्यासदौऱ्याच्या नावाखाली उधळपट्टी
By Admin | Published: January 4, 2016 02:44 AM2016-01-04T02:44:05+5:302016-01-04T02:44:05+5:30
मीरा-भाईंदर महापालिकेत सर्वच्या सर्व ९८ नगरसेवकांसह सुमारे पाच अधिकारी-कर्मचारी येत्या फेब्रुवारीत म्हैसूरला अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत
मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेत सर्वच्या सर्व ९८ नगरसेवकांसह सुमारे पाच अधिकारी-कर्मचारी येत्या फेब्रुवारीत म्हैसूरला अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने एमएमआरडीएने विकासकामांसाठी कर्ज देण्यास नकार दिला तर दुसरीकडे साधारण ६० लाखांचा खर्च करुन या अभ्यास दौऱ्याचा घाट घातला जात आहे.
शहरातील नागरिक पाणीटंचाई, कचरा, डास, खराब व अतिक्रमित रस्ते-फुटपाथ आदी समस्यांनी त्रस्त असताना गेल्या काही महिन्यांपासून म्हैसूर व उटी येथे अभ्यास दौरा काढण्याची धावपळ सुरु झाली आहे. त्यासाठी तीन वेळा निविदा मागवण्यात आल्या होत्या. परंतु, एकच निविदा प्राप्त झाल्याने श्रीनिशी एंटरप्रायझेसला दौऱ्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ठेकेदाराने प्रतिव्यक्ती ७४ हजार रु पये इतका खर्च निविदेत दिला होता. परंतु, खर्च वाढेल म्हणून उटीला जाणे रद्द करून वाटाघाटीत ६० हजार रुपये प्रतिव्यक्ती दर आयुक्तांनी निश्चित केला. चार रात्री व पाच दिवसांचा हा दौरा असून हवाईमार्गे बंगळुरू व तेथून म्हैसूर असा प्रवास असेल. मीरा-भार्इंदर महापालिकेचे सध्या निवडून आलेले ९३ तर स्वीकृत पाच असे ९८ नगरसेवक आहेत. सर्वपक्षीय नगरसेवकांचा अभ्यास दौरा काढण्याची मागणी नगरसेवकांमधून सातत्याने होत होती. महापौर गीता जैन यांनीदेखील त्यास होकार दर्शवला होता.
नोव्हेंबरमध्ये महिला बालकल्याण समितीच्या व वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांची मुदत संपलेली असतानाही त्यांचे अभ्यास दौरे घडले. महिला बालकल्याणच्या माजी सदस्यांनी सुमारे सहा लाख खर्चून त्रिवेंद्रम व कन्याकुमारी येथे तर वृक्ष प्राधिकरणच्या माजी सदस्यांनी सुमारे १० लाख खर्चून देहरादून, सिमला आदी पर्यटनस्थळी अभ्यास दौरा केला होता.