पनवेलमध्ये भीषण पाणीसमस्या, एप्रिलपूर्वी आप्पासाहेब वेदक धरणाचा पाणीसाठा संपुष्टात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:46 AM2018-03-01T02:46:22+5:302018-03-01T02:46:22+5:30
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा एकदा पाण्याची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सिडको वसाहतीत आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा केला जात नाही.
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा एकदा पाण्याची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सिडको वसाहतीत आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा केला जात नाही. विशेष म्हणजे, पनवेलला पाणीपुरवठा करणाºया आप्पासाहेब वेदक धरणातील पाणीसाठा एप्रिलपूर्वी संपुष्टात येणार असल्याने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात आप्पासाहेब वेदक धरण, एमजेपी, एमआयडीसी, सिडको आदी प्राधिकरणांच्या मार्फत पाणीपुरवठा केला जातो. यापैकी खारघर, कळंबोली, कामोठे नोडमध्ये सिडको मार्फत पाणीपुरवठा केला जातो. तर नवीन पनवेल शहराला एमजेपी व सिडकोमार्फत पाणीपुरवठा केला जातो. तर पनवेल शहराला एमजेपी, आप्पासाहेब वेदक धरण व एमआयडीसी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, आप्पासाहेब वेदक धरणातील पाणीसाठा एप्रिल महिन्यापूर्वीच संपुष्टात येणार असल्याने पनवेलकरांना दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. सध्या स्थितीला महापालिका क्षेत्रात असलेल्या सिडको नोडपैकी खारघरमध्ये ७० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी ६५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. तसेच कळंबोली शहराला ४२ एमएलडीची आवश्यक असताना, ३८ एमएलडी मिळतो, कामोठेला आवश्यकता ३८ एमएलडीची असून, ३५ एमएलडी मिळतो, नवीन पनवेल शहराला ४२ एमएलडी आवश्यकता असताना मिळते ३४ एमएलडी पाणी, पनवेल शहराला ३० एमएलडीची आवश्यकता असताना २० एमएलडी पाणी मिळते, तसेच पालिकेत समाविष्ट २९ गावांना २० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, केवळ दहा एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे, पालिकेत समाविष्ट ११ गावांना अद्याप बोरिंग, विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे.
पावसाळ्यापूर्वीचे १०० दिवस हे महापालिकेसमोर आवाहन असणार आहे. याकरिता सिडको, एमजेपी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेची मदत घ्यावी लागणार आहे.
अमृत योजनेचा लाभ ३वर्षांनंतर
४०० कोटींच्या अमृत योजनेला मंजुरी मिळाली आहे. या योजनेअंतर्गत ४० पाणीसाठा करणाºया टाक्या नव्याने बांधल्या जाणार आहेत. १६५ कि.मी.ची जलवाहिनी याकरिता नव्याने टाकली जाणार आहे. मे २०१८ला या कामाला सुरु वात होणार आहे. पुढील तीन वर्षांत हे काम संपुष्टात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पालिका क्षेत्रात मुबलक पाणीपुरवठा होईल. मात्र, तोपर्यंत पाण्याच्या समस्येशी दोन हात करण्यासाठी पालिकेला प्रभावी योजना आखावी लागणार आहे.
११ गावे बोरिंगवर-
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २९ गावांपैकी ११ गावांत अद्याप जलवाहिनी पोहोचलेली नाही. या ठिकाणच्या रहिवाशांना केवळ बोरिंग, विहीर आदी पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. धानसर, रोहिंजण, खुटारी, एकटपाडा, किरवली, पिसार्वे, धारणा, धारणा कॅम्प, तुर्भे, करवले, बीड ही ११ गावे आहेत.
निर्णयाची अंमलबजावणी करावीच लागणार-
१४ फेब्रुवारीपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सत्ताधाºयांनी हा निर्णय मागे घेण्यास प्रशासनाला भाग पाडले होते. मात्र, महापौरांच्या दालनात २८ फेब्रुवारीला एमजेपी अधिकाºयांसोबत घेतलेल्या बैठकीत एमजेपी अधिकाºयांनी महानगरपालिकेला जादा पाणीपुरवठा करता येणार नसल्याचे सांगितल्याने शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रशासनाच्या निर्णयाचा अवलंब करावाच लागणार असल्याचे दिसून येत आहे.