ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 03:38 AM2018-04-30T03:38:49+5:302018-04-30T03:38:49+5:30

पनवेल महानगरपालिकेला भेडसावणारी पाणीसमस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शहरी भागात काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरळीत होत असला, तरी ग्रामीण भागात मात्र पाण्याचे दुर्भिक्ष नर्माण झाले आहे

Extreme water shortage in rural areas | ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई

ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई

Next

वैभव गायकर 
पनवेल : पनवेल महानगरपालिकेला भेडसावणारी पाणीसमस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शहरी भागात काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरळीत होत असला, तरी ग्रामीण भागात मात्र पाण्याचे दुर्भिक्ष नर्माण झाले आहे. पाण्याच्या भीषण टंचाईचा फटका ग्रामीण भागातील गावांना आणि आदिवासीपाड्यांना बसला आहे. त्यामुळे या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पनवेल महापालिकेत २९ महसुली गावांचा समावेश आहे. या ग्रामीण भागात आदिवासीपाड्यांचाही समावेश आहे. संपूर्ण पनवेल महापालिकेला दररोज २५० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे; परंतु यापैकी फक्त १८० एमएलडी पाणी महापालिका क्षेत्राला मिळते. ग्रामीण भागाची मागणी २० एमएलडी असताना, प्रत्यक्षात केवळ १० एमएलडी पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. या ग्रामीण भागात आदिवासीपाड्यांची अवस्था तर आणखीनच बिकट आहे. बोअरवेल किंवा डोंगराच्या पायथ्याची खोदलेल्या खड्ड्यातून आदिवासी बांधवांना पाणी भरावे लागत आहे. त्यातच विहिरी, खड्डे यामधील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे आदिवासी बांधव हतबल झाले आहेत. सिडको तसेच पनवेल महापालिकेचेही या आदिवासीपाड्याकडे सपशेल दुर्लक्ष होत चालले आहे. आमच्या यातना सांगाव्या तरी कोणाला, अशी भावना आदिवासी बांधव व्यक्त करीत आहेत. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक-३मधील धामोळे आदिवासीवाडीला सर्वात जास्त पाण्याच्या यातना सोसाव्या लागत आहेत. एकीकडे भव्य असे गोल्फ कोर्स, २४ तास गवतावर पाण्याचे फवारे आणि दुसरीकडे दुष्काळ सदृश स्थिती अशी परिस्थिती धामोळे आदिवासीपाड्यात निर्माण झाली आहे. या ठिकाणी सिडकोमार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, त्यामध्ये अनियमितता असल्यामुळे भरउन्हात येथील महिलांना पाण्यासाठी शहरभर भटकंती करावी लागत आहे. शहरातील रहिवाशांना अपुरा पाणीपुरवठा झाल्यास ते सिडको व पालिकेवर मोर्चे काढतात; परंतु आम्ही हे करू शकत नाही, कारण आमचे हातावर पोट आहे. एक दिवस सुट्टी केली तरी घरच्या चुली पेटणार नाहीत, अशी खंत बाळाराम पारधी या युवकाने ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे. खारघरमधील घोळवाडी आदिवासीवाडीतही हीच समस्या आहे. या वाडीतून मंजुळा कातकरी या नगरसेविका निवडून आल्या आहेत.
ग्रामीण भागात पडघे गावाला या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एमआयडीसीने महिनाभरापूर्वी या ठिकाणी पाणीकपात केली असल्याने येथील ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, पालिकेमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना नियमितता नसल्याने गावात पाणीसमस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला समोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवक विष्णू जोशी यांनी व्यक्त केली आहे.
या परिसरात टेंभोडे, वळवली या गावांतदेखील पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. अनेकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, येथील वार्घ्याची वाडी आदिवासीवाडीतही पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे.

५00पेक्षा जास्त बोअरवेल, विहीर निरुपयोगी
पडघे, वळवली, टेंभोडे या परिसरात ५00पेक्षा अधिक बोअरवेल व विहिरी आहेत; परंतु तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणामुळे बोअरवेल व विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. या पाण्यातून उग्र वास येत असल्याने हे पाणी पिण्यायोग्य नाही. एकूणच या परिसरात असलेल्या पाचशेपेक्षा अधिक बोअरवेल आणि विहिरी निरुपयोगी ठरल्या आहेत.
 

Web Title: Extreme water shortage in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.