भावे नाट्यगृहाच्या दुरवस्थेवर लक्षवेधी
By admin | Published: July 20, 2015 02:46 AM2015-07-20T02:46:22+5:302015-07-20T02:46:22+5:30
वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या दुरवस्थेकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक रवींद्र इथापे सभागृहात लक्षवेधी मांडणार आहे
नवी मुंबई : वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या दुरवस्थेकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक रवींद्र इथापे सभागृहात लक्षवेधी मांडणार आहे. नाट्यगृहाची दुरवस्था थांबवावी, अशी मागणी केली जाणार आहे.
शहरातील महत्त्वाच्या विषयांवर सभागृहामध्ये लक्षवेधी मांडली जाते. बहुतांश वेळा शहरातील समस्यांविरोधात विरोधकांकडून लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठविला जातो. विष्णुदास भावे नाट्यगृहातील दुरवस्थेकडे मनसेने लक्ष वेधले होते. आयुक्तांना बोलावून वस्तुस्थिती दाखविली होती. तरीही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी लक्षवेधी मांडण्याचा निर्णय घेतला आहे. नेरूळमधील रवींद्र इथापे सोमवारी सर्वसाधारण सभेत याविषयी पत्र देणार आहेत. नाट्यगृहातील कुलिंग वॉटर आणि एसी प्लँट पूर्णपणे गंजलेले आहेत. ६० टनाचे ३ व ९० टनाचा एक कुलिंग टॉवर सिडकोकालीन असून ते जुने झाले आहेत. एअर हँडलिंग युनिटमध्येही वारंवार बिघाड होतात. ध्वनि आणि प्रकाश व्यवस्थेतही बिघाड होत आहेत. जाहिरात फलकाची दुरवस्था झाली आहे. कलाकार कक्षातील भिंतीच्या लाद्या निघालेल्या आहेत. बाथरूम, कलाकार निवास व नाट्यगृहातील इतर भागातही लाद्या तुटल्या आहेत. अॅल्युमिनीयम खिडक्या, दरवाजांची दुरवस्था झाली आहे. (प्रतिनिधी)