मयत सासऱ्याच्या घरावर जावयाचा डोळा; भावासाठी बहिणीने सोडले प्राण
By सूर्यकांत वाघमारे | Published: September 2, 2022 08:59 PM2022-09-02T20:59:10+5:302022-09-02T21:00:26+5:30
भावाकडून घरात हिस्सा मागण्यासाठी नवरा आणि सासूकडून छळ सुरू होता.
नवी मुंबई : वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या घरात हिस्सा मागण्यासाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ सुरु होता. परंतु आई वडिलांच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या भावाच्या विचाराने बहिणीकडून त्यासाठी नकार दिला जात होता. अखेर सासरच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. भावाच्या तक्रारी नंतर हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरुळ सेक्टर २० येथे सोमवारी रात्री हा प्रकार घडला असून, श्रुती माने (२२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. नेरुळ येथे राहणाऱ्या निलेश माने याच्यासोबत तिचा प्रेमविवाह झालेला आहे. तिच्या आईचे २०२० मध्ये निधन झाल्यानंतर वर्षभरात तिचे निलेश सोबत लग्न लावून देण्यात आले होते. लग्नानंतर तिने जुनी नोकरी सोडून आईच्या पाश्च्यात भाऊ व वडिलांकडेही लक्ष देण्यासाठी तिने मानखुर्द मध्येच अंगणवाडी सेविकेची नोकरी स्वीकारली होती. परंतु पृवीच्या नोकरीत मिळणाऱ्या पगारात व सध्याच्या पगारात तफावत असल्याने त्यावरून पती निलेश हा तिच्यासोबत वाद घालत होता. तिच्याकडे अधिक रकमेची मागणी करत तिचा छळ सुरु असतानाच ऑगस्ट महिन्यात तिच्या वडिलांचे निधन झाले.
यामुळे एकाकी पडलेल्या भावाची तिला चिंता लागली होती. अशातच वडिलांच्या निधनानंतर मानखुर्द येथील घराचा भावाकडे हिस्सा मागण्यासाठी तिच्यावर पती व सासूकडून दबाव टाकला जात होता. याच कारणातून २९ ऑगस्टला तिला घरातून हाकलून देण्यात आले होते. यावेळी तिने मानखुर्द येथील माहेरी जाऊन घडलेल्या प्रकाराबद्दल भावाकडे आक्रोश केला होता. त्यावेळी भावाने त्यावर तोडगा काढू असे सांगून तिला सासरी पाठवले होते. परंतु त्याच दिवशी संध्याकाळी तिने गळफास लावून आत्महत्या केली. सासरच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार तिचा भाऊ अजय जाधव याने पोलिसांकडे केली आहे. त्याद्वारे गुरुवारी नेरुळ पोलीस ठाण्यात पती निलेश माने व सासू नंदा माने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दिवशी कोपर खैरणेत देखील विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. त्यामुळे शहरात विवाहितेच्या हुंड्यासाठी छळाच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे.