- नामदेव मोरेनवी मुंबई : तुर्भेमधील राज्य परिवहन मंडळाच्या डेपोचा भूखंड पुन्हा ताब्यात घेण्याच्या हालचाली सिडकोने सुरू केल्या आहेत. या भूखंडावर अवजड वाहनांसाठी वाहनतळ उभारण्याचा विचार सुरू आहे. एसटी महामंडळाने यापूर्वी येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली होती. आरटीओ विभाग सद्यस्थितीमध्ये येथे कारवाई केलेली वाहने उभी करत असून, बाजार समितीनेही कलिंगड व इतर व्यवसायासाठी भूखंडाची मागणी केली आहे. यामुळे हा भूखंड नक्की कोणाच्या ताब्यात जाणार व त्याचा काय वापर होणार, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवी मुंबई नियाेजनबद्ध शहर असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात शहराच्या नियोजनामध्ये अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत. राज्य परिवहन मंडळाचा डेपो शहरात उभा करण्यामध्येही सिडको व शासनाला अपयश आले आहे. शहरातून हजारो प्रवासी प्रति दिन देशभर प्रवास करत असतात. खासगी व एसटी बसेसचा प्रवासासाठी वापर केला जातो, परंतु या प्रवाशांना एकही सुसज्ज बस स्थानक नाही. यामुळे वाशी, सानपाडा, तुर्भे, जुईनगर, नेरुळ व सीबीडीमध्ये महामार्गावरच प्रवाशांना बसेसची वाट पाहावी लागत आहे. सिडकोने यापूर्वी तुर्भे मध्ये दोन भूखंड एसटी महामंडळाला दिले आहेत. फळ मार्केटसमोरील भूखंडावर छोटेसे बस स्थानक सुरूही केले होते, परंतु त्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे या डेपोचा वापर होऊ शकला नाही. मोकळ्या भूखंडाचा अनेक वर्षांपासून वापरच होत नाही. या भूखंडावर अनेक वेळा फळे पॅकिंग करणारांनी व इतरांनीही अतिक्रमण केले होते. सद्यस्थितीमध्ये हा भूखंड ताब्यात मिळविण्यासाठी तीन सरकारी अस्थापनांमध्ये स्पर्धा सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे. काही महिन्यांपासून आरटीओ कार्यालयाने कारवाई केलेली वाहने या भूखंडावर उभी करण्यास सुरुवात केली आहेत. आरटीओने भूखंड मिळावा, अशी मागणी केली नसली, तरी त्याचा वापर सद्यस्थितीमध्ये त्यांच्याकडून सुरू आहे. सिडको महामंडळाने हा भूखंड राज्य परिवहन विभागाकडून पुन्हा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या ठिकाणी सिडको ट्रक टर्मिनल सुरू करण्याचा विचार करत आहे. दुसरीकडे मुंबई बाजार समितीने हा भूखंड विस्तारित फळ मार्केटसाठी ताब्यात मिळावा, अशी मागणी केली आहे. यामुळे आता हा भूखंड नक्की कोणाला मिळणार व त्याचा वापर काय केला जाणार, याविषयी उत्सुकता लागली आहे.
बाजार समितीने केला ठराव मुंबई बाजार समितीने फळ मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी कलिंगड व खरबूजचा व्यापार एसटीच्या भूखंडावर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ठराव मंजूर करून तो पणन विभागाच्या मंजुरीसाठी पाठवून दिला आहे. यामुळे सदर भूखंडावर सदर व्यवसाय स्थलांतर करण्यासाठी परवानगी मिळणार की नाही, याकडेही लक्ष लागले आहे. एसटी डेपो कधी तयार होणार? नवी मुंबईमध्ये खासगी व सरकारी दोन्ही बसेससाठी डेपो सुरू करणे आवश्यक आहे, परंतु सिडकोचे चुकलेले नियोजन, शासनाचे दुर्लक्ष व शहरातील राजकीय सामाजिक संघटना दक्ष नसल्यामुळे अद्याप राज्य परिवहन मंडळाचा डेपोही तयार झालेला नाही. तुर्भेमधील भूखंड सिडकोने ताब्यात घेतला, तर भविष्यातही बस आगार नवी मुंबईमध्ये होऊ शकणार नाही व त्याचा फटका शहरवासीयांना कायमस्वरूपी बसणार आहे.