लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी रविवारी जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. त्यात तब्बल ८९ जणांना स्थान दिले आहे. विशेष म्हणजे सर्व घटकांतील कार्यकर्त्यांचा यात समावेश केला आहे. तर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, विधान परिषदेचे सदस्य रमेश पाटील, माजी खासदार संजीव नाईक यांना कार्यकारिणीत स्थान दिले आहे.
जिल्हा कार्यकारिणीत चार सरचिटणीस तर दहा उपाध्यक्ष नियुक्त केले आहेत. त्याचप्रमाणे दहा जणांवर चिटणीसपदाची जबाबदारी सोपविली आहे. कोषाध्यक्षपद भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी अरुण पडते यांना दिले आहे. एकूणच कार्यकारिणी गठीत करताना ज्येष्ठ माजी नगरसेवक, युवक आणि युवतींनाही संधी दिली आहे. जिल्हा कार्यकारिणी घोषित करतानाच मंडळ अध्यक्षांचीही घोषणा केली आहे. त्यानुसार दिघा विभागाच्या अध्यक्षपदी विरेश सिंह, अशोक पाटील (ऐरोली), घनश्याम मढवी (घणसोली), संदीप म्हात्रे (कोपरखैरणे), विजय वाळुंज (वाशी), शशिकांत भोईर (तुर्भे), वैभव भास्कर (सानपाडा), कुणाल महाडिक (नेरूळ, पूर्व), गिरीश कान्हा म्हात्रे (नेरूळ, पश्चिम), विनोद म्हात्रे (सीवूडस्) आणि अशोक गुरखे (सीबीडी बेलापूर) अशा अकरा मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी माधुरी सुतार यांची नियुक्ती केली आहे. युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अमित मेढकर यांची वर्णी लागली आहे. त्याचप्रमाणे किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी सुनील कुरकुटे, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी चंद्रकांत रामदास पाटील आणि आदिवासी मोर्चाच्या अध्यक्षपदी रमेश डोळे यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे पदवीधर प्रकोष्ठ, क्रीडा, सांस्कृतिक सेल, आयटी सेल, आयुष्मान भारत सेल, पंचायत राज व ग्रामविकास, बेटी बचाओ, बेटी पढाओ सेल आणि बुद्धिजीवी आदी सेलच्याही नियुक्त्या केल्या आहेत.