श्वान नियंत्रण केंद्र उभारण्यात अपयश
By admin | Published: February 21, 2017 06:33 AM2017-02-21T06:33:39+5:302017-02-21T06:33:39+5:30
स्वच्छ भारत अभियानाचा पुरस्कार मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे
नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानाचा पुरस्कार मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शहरात रोज सरासरी ४० जणांना श्वानदंश होत आहे. यासाठीची लस खरेदी करण्यासाठी ५० ते ६० लाख रुपयांचा खर्च जात आहे. याशिवाय निर्बीजीकरण व जुन्या केंद्राच्या देखभालीवर लाखो रुपये खर्च होत आहेत. नागरिक व लोकप्रतिनिधी वारंवार पाठपुरावा करत आहेत. यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद असतानाही प्रशासन हा प्रश्न सोडवत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तीन हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून, गत वर्षीच्या अर्थसंकल्पातील महसूल संकलनाचे उद्दिष्टही पूर्ण केले आहे; परंतु मागील आठ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी स्वच्छ भारत अभियान वगळता इतर कोणत्याही कामावर फारसे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. शहरवासीयांची गरज असून व तिजोरीमध्ये करोडो रुपये शिल्लक असतानाही अत्यावश्यक कामे करण्यात आलेली नाहीत. दुर्लक्ष झालेल्या या प्रकल्पांमध्ये श्वान नियंत्रण केंद्राचाही समावेश आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या ५० हजारपेक्षा जास्त झाली आहे. रात्री जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवर कुत्र्यांमुळे दहशतीचे वातावरण आहे. आॅक्टोेबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ या वर्षभरामध्ये तब्बल १४,४५३ नागरिकांना कुत्रे चावल्याची घटना घडली आहे. प्रत्येक वर्षी या घटनांमध्ये जवळपास १० ते १५ टक्के वाढ होत आहे. पुढील वर्षभरामध्ये कुत्रे चावलेल्या नागरिकांची संख्या जवळपास १५,८०० होण्याची शक्यता असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तब्बल ६४ लाख ७० हजार रुपयांचा खर्च होणार आहे. याशिवाय २०१४ मध्ये श्वान निर्बीजीकरण व नियंत्रण केंद्राच्या देखभालीसाठी जवळपास १७ लाख रुपये खर्च झाला होता. २०१६ - १६ या आर्थिक वर्षात हा खर्च तब्बल १ कोटी ४० लाखांवर गेला आहे. पुढील वर्षासाठी १ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद केली आहे. कुत्र्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी १०० टक्के निर्बीजीकरण करणे हा एकमेव पर्याय आहे.
महापालिका प्रत्येक वर्षी जवळपास १ कोटीपेक्षा जास्त खर्च करूनही भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यात अपयश आले आहे. प्रत्येक महिन्याला किमान १ हजार १५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे आवश्यक आहे; परंतु डम्पिंग ग्राऊंडवरील केंद्रातील अपुऱ्या जागेमुळे जेमतेम ४०० ते ४५० शस्त्रक्रिया करणे शक्य होत आहे. २०१५-१६ या वर्षामध्ये ५,१०७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून २०१६-१७मध्ये फेब्रुवारीपर्यंत ४,३०६ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. पालिकेचे पूर्वी पामबीच रोडवर कोपरी येथे केंद्र होते; परंतु ते धोकादायक झाल्याने डम्पिंग ग्राऊंडवर हलविण्यात आले आहे.