महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:18 AM2019-12-31T00:18:46+5:302019-12-31T00:18:55+5:30

नवी मुंबई मेट्रो धावलीच नाही; पामबीच रस्त्याच्या विस्तारीकरणाचे कामही अपूर्ण; होल्डिंग पाँडची समस्या जैसे थे

Failure to complete ambitious project | महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात अपयश

महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात अपयश

Next

- नामदेव मोरे 

नवी मुंबई : पनवेलसह नवी मुंबईमध्ये मागील वर्षभरामध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात महापालिकेसह सिडकोलाही अपयश आले आहे. मेट्रो रेल्वे या वर्षीही धावली नाही. घणसोलीमधील पामबीच रोडचे कामही अपूर्णच असून, शहरातील सर्व होल्डिंग पाँडमधील गाळही काढता आलेला नाही.

विकासकामांच्या बाबतीत शहरवासीयांसाठी २०१९ हे वर्ष निराशाजनक ठरले आहे. सिडकोने ८९०४ कोटी रुपये खर्च करून चार टप्प्यामध्ये मेट्रो रेल्वेचे काम सुरूकेले आहे. १ मे, २०११ मध्ये बेलापूर ते पेंधर या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले. ३,०६३ कोटी रुपये या कामासाठी खर्च केले जात आहेत. आठ वर्षांपासून हे काम सुरू आहे. विधानसभा निवडणुकांच्या अगोदर मेट्रो धावेल, असा अंदाज नागरिकांना वाटू लागला होता, परंतु प्रत्यक्षात मेट्रोची चाचणी पाहण्यावरच समाधान मानावे लागले आहे. मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी नवीन वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. मेट्रोप्रमाणेच पामबीच रोडचे घणसोलीमध्ये रखडलेले कामही वर्षभरामध्ये मार्गी लागू शकले नाही. खारफुटीचा अडथळा असल्यामुळे हे काम थांबले आहे. हा रोड पूर्ण झाला असता, तर पामबीचवरून एका मार्गिकेवरून ऐरोली व दुसऱ्या मार्गिकेवरून थेट मुंबईला जाणे शक्य झाले आहे, परंतु तो प्रकल्पही अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. नवी मुंबई महानगरपालिका ऐरोलीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनची उभारणी करत आहे. या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन लोकार्पणही झाले, परंतु दुसºया टप्प्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. विविध कारणांमुळे हे काम रखडले असून, लोकप्रतिनिधींसह नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

खारफुटीमुळे शहरातील अनेक प्रकल्प रखडले असून, त्यामध्ये सीवूड रेल्वे स्थानक ते नवीन सेक्टर ५०ला जोडणाºया रोडचाही समावेश आहे. खारफुटीचा अडथळा असल्यामुळे एक लेनचे काम अनेक वर्षांपासून थांबले आहे. महापालिकेने परवानगीसाठी कांदळवन समितीकडे प्रस्ताव पाठविला आहे, परंतु अद्याप त्यास परवानगी मिळालेली नाही. स्थानक व महापालिकेकडून येताना दोन मार्गिका आहेत, परंतु पुलाजवळ एकच मार्गिका असल्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. हा प्रश्न लवकर सुटावा, अशी मागणी रहिवासी करू लागले आहेत.

वाशी विभाग कार्यालय व याच परिसरातील समाज मंदिराचे कामही दहा वर्षांपासून सुरू असून, अद्याप पूर्ण झालेले नाही. समाज मंदिराचे बांधकाम एका बाजूला कलले असल्यामुळे ते तोडायचे की, पूर्ण करायचे, याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. विभाग कार्यालयाचे बांधकाम झाले नसल्यामुळे मासळी मार्केटमध्ये कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. स्थानिक नगरसेवक प्रकाश मोरे यांनी याविषयी वारंवार पाठपुरावा केला असूनही हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

अकरा होल्डिंग पाँडची समस्या गंभीर
२०० हेक्टर क्षेत्र या तलावांनी व्यापले आहेत. खारफुटीमुळे कित्येक वर्षामध्ये या तलावांमधील गाळ काढता आलेला नाही. ऐरोलीमधील नगरसेवक अशोक पाटील, वाशीमध्ये दिव्या गायकवाड यांच्यासह अनेकांनी तलावांमधील गाळ काढण्यासाठी सभागृहात वारवांर आवाज उठविला आहे, परंतु अद्याप गाळ काढण्यात आलेला नसल्यामुळे भविष्यात पुराचा फटका शहराला बसण्याची शक्यता आहे.

Web Title: Failure to complete ambitious project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो