महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:25 AM2019-03-15T00:25:30+5:302019-03-15T00:25:47+5:30

शहराच्या विकासामध्ये अल्प वाटा; स्वातंत्र्यानंतर केंद्राचा एकही मोठा प्रकल्प नाही

Failure to implement ambitious project | महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात अपयश

महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात अपयश

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईच्या विकासामध्ये लोकसभा सदस्यांचे योगदान मात्र अत्यंत अल्प आहे. खासदारांनी पाठपुरावा करून अद्याप एकही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केलेला नाही. किरकोळ विकासकामे करून त्यांचे श्रेय घेण्यासाठीची स्पर्धा मात्र नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये सुरू असल्याचे चित्र नेहमीच पाहावयास मिळत आहे.

ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी महापालिकेच्या रुग्णालयासाठी दिलेला निधी पालिकेने वापरला नाही. कोपरखैरणेमध्ये कब्रस्तानला दिलेल्या निधीला स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसने विरोध केला. वाशीमध्ये सुरू झालेल्या पासपोर्ट कार्यालयाचे नक्की श्रेय कोणाचे यावरून शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सोशल मीडियावरूनही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आक्रमकपणे भूमिका मांडू लागले असून यानिमित्ताने स्वातंत्र्यानंतर खासदारांनी नवी मुंबईच्या विकासामध्ये नक्की काय योगदान दिले याविषयी प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेमध्ये रूपांतर झालेली नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे. राज्यातील प्रमुख औद्योगिक वसाहतीमध्ये ठाणे बेलापूर एमआयडीसीचा समावेश होतो. आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती याच परिसरामध्ये आहे. देशातील सातव्या क्रमांकाचे व राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून देशभर नावलौकिक आहे. परंतु या सर्व विकासामध्ये खासदारांचा वाटा मात्र अत्यंत अल्प राहिला आहे. ठाणे मतदार संघाचा भाग असलेल्या नवी मुंबईकडे खासदारांचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. निवडणुकीपुरतेच खासदार येथे जास्त लक्ष देत असल्याचा अनुभव शहरवासीयांना यापूर्वी आला आहे. केंद्र सरकारचा निधी शहरासाठी खेचून आणण्यासाठी फारसा प्रयत्न झालेला नाही. कोणताच महत्त्वाकांक्षी प्रकल्प या परिसरामध्ये घेऊन येण्यात यश आलेले नाही.

ठाण्याचे आजी-माजी खासदारांनी रेल्वेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तुर्भे, सानपाडा, बेलापूरमधील पुलाचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला, परंतु त्यासाठीचा निधी महापालिकेलाच खर्च करावा लागला आहे.

शवदाहिनीचा उपयोग नाही
शिवसेनेचे खासदार प्रकाश परांजपे चार वेळा ठाण्याचे खासदार होते. त्यांच्या खासदार निधीमधून डिझेल शवदाहिनी उभारण्यात आली, परंतु त्या शवदाहिनीचा फारसा उपयोग झालाच नाही. सुरवातीला बेवारस प्रेत जाळण्यासाठी त्याचा उपयोग होत होता, परंतु सद्यस्थितीमध्ये शवदाहिनी बंद अवस्थेमध्येच आहे.

गेस्ट हाउसचा उपयोग नाही
राष्ट्रवादी काँगे्रसच्या तिकिटावर २००९ मध्ये निवडून आलेल्या संजीव नाईक यांच्या निधीमधून वंडर्स पार्कमध्ये गेस्ट हाउसची उभारणी व जॉगिंग ट्रॅकसह उद्यानामध्ये म्युझिक सिस्टीम सुरू करण्यात आली. या गेस्ट हाउसचा सर्वसामान्य नागरिकांना काहीही उपयोग होत नाही. गेस्टहाउसवर केलेला खर्च जनतेच्या दृष्टिकोनातून व्यर्थ गेला आहे.

सानपाड्यातील लिफ्ट बंदच : विद्यमान खा. राजन विचारे यांनी त्यांच्या निधीमधून नेरूळ, सानपाडा, सीबीडी, घणसोली, ऐरोलीमध्ये विविध विकासकामे केली. यामध्ये सानपाडा दत्तमंदिर परिसरातील पादचारी पुलाला लिफ्टही बसवली आहे.याचे लोकार्पण नुकतेच झाले. परंतु ही लिफ्ट बंदच आहे.

Web Title: Failure to implement ambitious project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.