पालिकेला शोध मुख्य आरोग्य अधिका-याचा, सक्षम अधिकारी नसल्याने सुविधा देण्यात अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 05:35 AM2018-01-11T05:35:27+5:302018-01-11T05:35:48+5:30
रौप्य महोत्सव पूर्ण केलेल्या नवी मुंबई महापालिकेला आरोग्य विभाग सक्षम करण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. विद्यमान आरोग्य अधिकारी विभागीय चौकशीमध्ये दोषी आढळले असून त्यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होऊ शकते. कारवाई झाली नाही तरी मार्चमध्ये ते निवृत्त होणार असून, त्यांच्यानंतर कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : रौप्य महोत्सव पूर्ण केलेल्या नवी मुंबई महापालिकेला आरोग्य विभाग सक्षम करण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. विद्यमान आरोग्य अधिकारी विभागीय चौकशीमध्ये दोषी आढळले असून त्यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होऊ शकते. कारवाई झाली नाही तरी मार्चमध्ये ते निवृत्त होणार असून, त्यांच्यानंतर कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
नवी मुंबई महापालिका राज्यातील सर्वात जास्त पुरस्कार मिळविणारी महापालिका आहे. पाणीपुरवठा, मलनि:सारण, साफसफाई, करवसुलीसह सर्व विभागात २५ वर्षांमध्ये चांगले काम करण्यात आले आहे; परंतु सर्वात महत्त्वाच्या आरोग्य विभागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. मनपाच्या स्थापनेनंतर त्रिस्तरीय आरोग्य यंत्रणा निर्माण करण्यात आली. आरोग्य केंद्र, माता बाल रुग्णालय व प्रथम संदर्भ रुग्णालय असे नियोजन करण्यात आले. कागदावर पालिकेची यंत्रणा सक्षम असली तरी प्रत्यक्षात शहरवासीयांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. मुख्य आरोग्य अधिकारी हे पदच सातत्याने वादग्रस्त ठरत आले आहे. पहिले मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संजय पत्तीवार हे खमके अधिकारी असले तरी त्यांची कारकीर्दही वादग्रस्त ठरली होती. त्यांना अतिरिक्त आयुक्त करण्यात आल्यानंतर वाद जास्तच वाढत गेले. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे व सद्यस्थितीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक एम. के. मढवी यांनी सातत्याने त्यांच्यावर पालिकेच्या सभागृहांमध्ये आवाज उठविला होता. प्रशासनाने सक्षमपणे आरोप कधीच फेटाळून लावले नाहीत. अखेरीस पत्तीवार यांना आरोग्य विभागापासून काही वर्षे थोडे बाजूला ठेवले होते. एका वर्षापूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली.
पत्तीवार यांच्यानंतर विद्यमान आरोग्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी यांच्यावर मुख्य आरोग्य अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली; पण त्यांच्या नोकरी सोडून नायजेरीयामध्ये जाण्याच्या प्रकरणावरून त्यांना या पदावरून दूर करण्यात आले. त्यांच्या जागेवर डॉ. रमेश निकम यांची नियुक्ती करण्यात आली. वर्षानुवर्षे एकच विभाग असलेल्या डॉक्टरांकडून विभाग बदलण्यात आले होते; पण त्यांच्या काळात या विभागामधील गटबाजी संपू शकली नाही. निवृत्तीच्या दरम्यान त्यांच्यावरही टीका होऊ लागली होती. त्यांच्या मुदतवाढीच्या प्रस्तावासही नगरसेवकांनी विरोध केला. अखेर ते निवृत्त झाले व परोपकारी यांच्याकडे पुन्हा मुख्य आरोग्य अधिकारीपद आले. त्यांचे नायजेरीया प्रकरण पुन्हा चर्चेत आले व विभागीय चौकशीमतध्ये ते दोषीही आढळून आले आहेत. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. कारवाई झाली नाही तरी मार्चमध्ये ते निवृत्त होणार आहेत. त्यांच्यानंतर आरोग्य विभागाची धुरा कोण सांभाळणार? हा प्रश्नच आहे. पालिकेकडे सक्षम अधिकारीच नसल्याने शासनाकडून नवीन अधिकारी मागवण्यात आला आहे.
शासनाकडे अधिकाºयाची मागणी
महापालिका आयुक्तपदावर तुकाराम मुंढे असताना त्यांनी मुख्य आरोग्य अधिकारी पदासाठी सक्षम अधिकारी मिळावा, अशी मागणी केली होती. विद्यमान आयुक्त रामास्वामी एन. यांनीही शासनाकडे मुख्य आरोग्य अधिकारी पदासाठी सक्षम अधिकारी मिळावा, अशी मागणी यापूर्वीच केली आहे. आयुक्तांच्या मागणीचा विचार करून शासन सक्षम अधिकारी महापालिकेसाठी देणार का? याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
पालिकेतील अधिकाºयांचीही चर्चा
महापालिकेमधीलही काही अधिकाºयांची या पदासाठी चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांचे नाव आघाडीवर आहे. जवादे यांनी प्रथम संदर्भ रूग्णालयाचे कामकाज चांगल्या प्रकारे सांभाळले आहे. जवादे यांच्यानंतर डॉ. दयानंद कटके यांचे नावही चर्चेत आहे. मुख्यालयात विविध प्रकल्प सक्षमपणे हाताळणाºया काही महिला वैद्यकीय अधिकाºयांचेही नाव चर्चेत आहे. पालिका यापैकी कोणावर जबाबदारी सोपविणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गटबाजीचे राजकारण कोण थांबविणार
महापालिकेच्या आरोग्य विभागात गटबाजीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. परोपकारी, निकम यांच्या काळातही हे गट होते. एक गट दुसºया गटाच्या विरोधात षड्यंत्र करत असल्याचे नेहमीच पाहायला मिळते. नगरसेवकांनीही आरोग्य विभागात राजकारण्यांपेक्षाही मोठे राजकारण सुरू असल्याचे आरोप अनेकदा केले आहेत; परंतु ही गटबाजी थांबविणे अद्याप कोणालाच शक्य झालेले नाही. जोपर्यंत गटबाजी थांबणार नाही, तोपर्यंत आरोग्य विभागाचा कारभार सुधारणार नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.
आरोग्य विभागाची सद्यस्थिती
- तुर्भे व कोपरखैरणे माता बाल रूग्णालय दोन वर्षांपासून बंद
- ऐरोली, नेरूळ व सीबीडी रूग्णालय पूर्ण क्षमतेने पूर्ण करण्यात अपयश
- तीनही नवीन रूग्णालयांमध्ये कर्मचारी नियुक्ती व अत्यावश्यक उपकरणे नाहीत
- माता बाल रूग्णालयांचे कामकाज ठप्प झाल्याने प्रथम संदर्भ रूग्णालयावर भार
- हिरानंदानी सुपरस्पेशालिटी उपचारांचा सामान्य रूग्णांना लाभ नाही
- नागरी आरोग्य केंद्राविषयी नागरिकांमध्ये योग्य माहितीच नाही
- रूग्णालयामध्ये उपकरणांची व डॉक्टरांची कमतरता