पनवेलमधील रस्त्यांची दुरवस्था, खुले मॅनहोल ठरताहेत जीवघेणे; अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:49 AM2018-01-15T00:49:53+5:302018-01-15T00:49:55+5:30
पनवेलमधील नागरिक सध्या खड्ड्यांमुळे त्रस्त असून, चालकांना याचा मोठा फटका बसत आहे. शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. अनेक ठिकाणी असलेले खुले मॅनहोल हे जीवघेणे ठरत
वैभव गायकर
पनवेल : पनवेलमधील नागरिक सध्या खड्ड्यांमुळे त्रस्त असून, चालकांना याचा मोठा फटका बसत आहे. शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. अनेक ठिकाणी असलेले खुले मॅनहोल हे जीवघेणे ठरत असूनदेखील प्रशासनामार्फत योग्य त्या उपाययोजना राबविल्या जात नाहीत.
पनवेलमधील गार्डन हॉटेल, नित्यानंद मार्ग अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र, प्रशासनामार्फत खड्डे बुजवण्याबाबत वेळकाढू भूमिका घेतली जात असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे पनवेलमधील नागरिकांना कमरेचे दुखणे, पाठीचे दुखणे, मणक्याचे दुखणे, अंगदुखी व रस्त्यावरील धुळीमुळे श्वसनाचे विकार जडलेले असून, नागरिक खड्ड्यांमुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत.
पनवेलमधील जयभारत नाका-सावरकर चौक ते अमरधाम स्मशानभूमी रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. अपघाताची शक्यता वाढली आहे. नवीन पनवेलमधील शबरी हॉटेलजवळ अशाच प्रकारे मॅनहोलचे काम हाती घेण्यात आले आहे. याकरिता अनेक दिवसांपासून या ठिकाणचा मार्ग बंद करण्यात आला होता. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी भूमिगत विद्युतवाहिन्या टाकण्यासाठी वारंवार रस्त्याचे खोदकाम हाती घेतले जाते. पनवेल शहरात मध्यवर्ती ठिकाण म्हणून लोखंडी पाडा परिसरात जिल्हा सत्र न्यायालय काही महिन्यांपूर्वी सुरू झाले आहे. संपूर्ण जिल्हा, नवी मुंबई तसेच मुंबईमधून आलेले पक्षकार व वकील या ठिकाणी रोज येत असतात. मात्र, आजूबाजूला असलेल्या खड्डेमय रस्त्यांमुळे पनवेल प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या कामाबद्दल चिंता व्यक्त करीत आहेत.
खुल्या मॅनहोलमुळे मोठी दुर्घटना
रस्त्याचे काम करीत असताना अनेक वेळा मॅनहोलचे झाकण उघडून ते त्याच स्थितीत ठेवले जाते. रात्रीच्या वेळेला हे मॅनहोल वाहनचालकांना दिसत नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने अशाप्रकारे उघड्या स्थितीत मॅनहोल ठेवणाºया कंत्राटदारावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.