उन्हाळी सुट्यांमुळे फेरीबोटचे आकर्षण
By admin | Published: May 16, 2017 12:56 AM2017-05-16T00:56:06+5:302017-05-16T00:56:06+5:30
शहरातील जगप्रसिद्ध एलिफंटा लेण्यांना भेट देता यावी, यासाठी बेलापूर ते एलिफंटा ही प्रवासी फेरीबोट सेवा दोन वर्षांपूर्वी सुुरू करण्यात आली
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शहरातील जगप्रसिद्ध एलिफंटा लेण्यांना भेट देता यावी, यासाठी बेलापूर ते एलिफंटा ही प्रवासी फेरीबोट सेवा दोन वर्षांपूर्वी सुुरू करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून या फेरीबोट सेवेला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने आर्थिक नुकसान झाले. मात्र उन्हाळी सुट्यांमध्ये या बोट वाहतुकीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अनेकदा प्रवासी नसल्याने दिवसातून एक ही फेरी होत नसल्याने ही जलवाहतूक सेवा तोट्यात आली होती. सध्या सुटी सुरू असल्याने प्रतिसाद वाढला आहे. या बोटीच्या देखभाल दुरु स्तीकरिता वर्षाला १५ ते २० लाख रु पये खर्च येतो तो खर्चदेखील परवडत नसल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे. नवी मुंबईच्या भूमिपुत्रांनी स्थापन केलेल्या हिंदजल प्रवासी वाहतूक सहकारी संस्थेच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही महिन्यांपासून प्रवाशांची संख्या निश्चित झाल्यावरच या बोटची फेरी केली जाते.
अनेकदा प्रवासी नसल्याकारणाने कित्येक दिवस या बोटचा वापरही केला जात नाही. अरबी समुद्रात वसलेल्या एलिफंटा लेणी किंवा घारापुरी लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. मात्र, नवी मुंबईकरांना ही लेणी पाहायची असतील तर नवी मुंबईतून या ठिकाणी जाण्यासाठी काहीच साधन नव्हते. ही जलप्रवासाची सोय नवी मुंबई शहरवासीयांबरोबरच इतर सर्व पर्यटकांना उपलब्ध व्हावी, यासाठी हिंदजल प्रवासी वाहतूक सहकारी संस्थेने प्रवासी फेरीबोट सुरू करण्याचे ठरविले.
२४ मेपासून ही फेरी बोटसेवा बंद होणार असून उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये पर्यटकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. इतर बोटसेवेपेक्षा ही फेरीबोट सेवा वेगवान, सुखकर असल्याचा दावाही संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. प्रवासी सुरक्षेची पुरेपूर दक्षता घेतली जात असून, याकरिता लाइफ जॅकेट, पाण्याची खोली मोजणारी आधुनिक यंत्रणा, पाण्यावर तरंगणाऱ्या रिंग, जीपीएस प्रणाली अशा विविध सुविधा अद्ययावत करण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.