पनवेल : पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या समर्थनार्थ पनवेलमधील मिडलक्लास मैदानात बुधवारी आयोजित केलेल्या पूर्वनियोजित सभेला पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. त्यामुळे संतप्त झालेल्या पनवेलकरांनी तोंडाला काळ्या फिती लावून आयुक्तांवरील विश्वासदर्शक ठराव पारित केला. दरम्यान, यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातल्याने सभेच्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने आयुक्त शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी २६ मार्च रोजी विशेष सभा बोलाविली आहे. परंतु डॉ. शिंदे यांची बदली होवू नये, यासाठी पनवेलमधील सामाजिक संस्था एकवटल्या आहेत. त्यांच्याच पुढाकारातून आयुक्त डॉ. शिंदे यांच्या समर्थनार्थ बुधवारी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत आयुक्तांच्या प्रति विश्वासदर्शक ठराव पारित केला जाणार होता. या सभेला भाजपासह शेकापचेही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु ऐनवेळी पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारल्याने आयोजकांनी संताप व्यक्त केला. असे असले तरी कोणतीही भाषणबाजी न करता मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पनवेलकरांनी तोंडाला काळ्या फिती लावून हात वर करून आयुक्तांवरील विश्वासदर्शक ठराव पारित केला.विशेष म्हणजे आयोजकांनी नागरिकांसमोर ठराव मांडताच भाजपाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले. यात पनवेल महापालिकेतील सभागृह नेते परेश ठाकूर आघाडीवर होते. आयुक्त हटाव, पनवेल बचाव अशाप्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच आम्हाला आमचे मते मांडण्याचा अधिकार आहे. त्यासाठी आम्हाला व्यासपीठावर येण्याची परवानगी द्यावी, असा आग्रह परेश ठाकूर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी धरला. पोलिसांनी भाजपा समर्थकांना रोखत परवानगी नसताना तुम्हाला या कार्यक्रमात आपले मत मांडता येणार नाही, असे बजावले. यावेळी भाजपाने कार्यक्र म ठिकाणी गोंधळ घालण्यास सुरु वात केली. भाजपाने सभेत गोंधळ घालताच कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेकाप समर्थकांनी देखील भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी भाजपाविरोधात घोषणाबाजी करीत आयुक्त बचाव, पनवेल बचाव अशाप्रकारच्या घोषणा दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत काही नगरसेवक देखील उपस्थित होते. कार्यक्रम संपला असताना देखील भाजपा कार्यकर्ते मैदानात गोंधळ घालत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी संबंधितांना मैदान तातडीने रिकामे करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, अशा गोंधळातही कोणतेही भाषणबाजी न करता अवघ्या २0 मिनिटात आयुक्तांवरील विश्वासदर्शक मंजूर करण्यात आला. यावेळी मंचावर कांतीलाल कडू, अरुण भिसे, कीर्ती मेहरा, कॅप्टन कलावत आदी उपस्थित होते .भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यताकार्यक्र माला परवानगी नसताना भाजपाने या सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता भाजपा कार्यकर्ते पोलिसांचे देखील ऐकण्याच्या मनिस्थतीत नव्हते. परवानगी नसलेल्या या सभेत ज्या लोकांनी गोंधळ घातला त्या सर्वांवरच गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.- या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली होती . मात्र अचानक दुपारी कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह आयोजक कांतीलाल कडू , अरु ण भिसे यांनी पोलीस उपायुक्त राजेंद्र माने यांची भेट घेतली. सभेला परवानगी मिळावी म्हणून तासभर उपायुक्तांसोबत चर्चा केली. मात्र तरी देखील परवानगी नाकारल्याने आयोजकांनी काळ्या फिती बांधून शांततेत कार्यक्र म पार पाडण्याचे ठरवले .
मूक सभेत जनतेचा विश्वासदर्शक ठराव; आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या समर्थनार्थ घेतली सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 3:12 AM