नवी मुंबई : शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून त्यांना बनावट नियुक्तीपत्रे देणाऱ्याला नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे. त्याने मागील काही महिन्यांत ५०हून अधिकांना नोकरीला लावण्यासाठी लाखो रुपये घेऊन बनावट नियुक्तीपत्रे दिल्याचे समोर आले आहे. तो खारघर येथे बारबालेच्या भेटीसाठी आला असता पोलिसांनी सापळा रचून अटक केली.सचिन हंबीरराव पाटील (३२) असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून मूळचा सांगलीतील वाटेगावचा राहणारा आहे. तो स्वत: सार्वजनिक बांधकाम विभागात सचिवपदावर कामाला असल्याचे सांगायचा. यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागात लिपिकपदावर नोकरीला लावण्याचे त्याने अनेकांना आमिष दाखवले होते. तर काहींकडून त्याने लाखो रुपये घेऊन नियुक्तीपत्रही दिले होते; परंतु संबंधितांनी पीडब्ल्यूडी कार्यालयात संपर्क साधल्यानंतर त्यांना मिळालेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचे समोर आले. अशाप्रकारे फसवणूक झालेल्या काहींनी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुशीलकुमार गायकवाड, पोलीस नाईक अमोल मोंडे, किशोर कोळी, संजय काकड व सतीश चौधरी यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांच्याकडून सचिन पाटीलचा शोध सुरू असतानाच तो खारघरमध्ये बारबालेच्या भेटीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. यानुसार गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. नेरुळ पोलिसांनी बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ९ मेपर्यंतची कोठडी सुनावली आहे. त्याने सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीचे आमिष दाखवून ५०हून अधिकांना बनावट नियुक्तीपत्र देऊन आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अशाच प्रकारातून त्याच्याविरोधात पुणे, औरंगाबाद, खेड, फलटण या ठिकाणीदेखील गुन्हे दाखल आहेत. तर यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का? याचाही तपास नेरुळ पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)
सार्वजनिक बांधकाम विभागाची बनावट नियुक्तीपत्रे
By admin | Published: May 04, 2017 6:19 AM