बनावट कॉलसेंटरवर छापा, आठ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 06:22 AM2019-04-14T06:22:36+5:302019-04-14T06:22:42+5:30

कर्ज अथवा विमा काढून देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या बनावट कॉलसेंटरवर गेल्या आठवड्यात कारवाई केली.

Fake call center arrests, eight arrested | बनावट कॉलसेंटरवर छापा, आठ जणांना अटक

बनावट कॉलसेंटरवर छापा, आठ जणांना अटक

googlenewsNext

नवी मुंबई : कर्ज अथवा विमा काढून देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या बनावट कॉलसेंटरवर गेल्या आठवड्यात कारवाई केली. सीबीडीच्या पोलीस आयुक्तालयात शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिसांनी ही माहिती दिली.
कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची तक्रार सायबर सेलकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त अजय कदम, सायबर शाखेचे वरिष्ठ निरीक्षक भाऊसाहेब गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात करण्यात आली होती. तक्रारदारांना आलेले फोन ड्रिम मॉलमधील एका सर्व्हिस सेंटरमधून आल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार गत आठवड्यात पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला होता. या वेळी तिथे चालणारे बनावट कॉलसेंटर उघड झाले. ड्रिम मॉलमधील भाड्याच्या गाळ्यामध्ये अल्ट्रा मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या नावाखाली कार्यालय सुरू करण्यात आले होते. त्या ठिकाणावरून गरजवंतांना फोन करून कर्ज अथवा विमा काढून देण्याचे आश्वासन दिले जायचे. याकरिता बजाज अलायन्स, रिलायन्स सर्व्हिसेस व इतर कंपन्यांच्या नावाचा वापर केला जायचा. याकरिता सदर कंपन्यांच्या नावाशी साम्य असलेली बनावट बँक खातीही उघडण्यात आली होती. दरम्यान, त्यांच्या खोट्या आश्वासनाला कोणी बळी पडल्यास त्यांना कर्ज अथवा विमा काढून देण्यासाठी लागणारे शुल्क दिल्ली, नोयडा अथवा गाझियाबाद येथील बँक खात्यात भरण्यास सांगितले जायचे.
अटक केलेल्यांची रोहित पार्टे (२९), प्रशांत कोटीयन (२८), नीलेश पडवळे (३१), प्रवीण निंबाळकर (२८), राहुल वैराळ (२६), विक्रांत गजमल (२९), परेश दीपकर (३४) व सुमित सावंत (२४) अशी नावे आहेत. त्यांच्या कार्यालयातून तीन लॅपटॉप, २० मोबाइल फोन व एक संगणक व तीस हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
>झटपट श्रीमंतीसाठी भांडुपला उघडले सेंटर
अटक केलेले आठही जण यापूर्वी विक्रोळी येथील एका कंपनीत एकत्र कामाला होते. तेथील ग्राहकांची माहिती त्यांच्याकडे होती. या आधारे तसेच झटपट श्रीमंतीसाठी त्यांनी एकत्रित येऊन भांडुपला बनावट कॉलसेंटर सुरू केले होते. त्यांनी राज्यभरात अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता असून, त्यापैकी दोन घटना खारघर व उरणमधील आहेत. त्यांची एकूण साडेपाच लाखांची फसवणूक झालेली आहे.

Web Title: Fake call center arrests, eight arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.