बनावट कंपन्या, शिक्के बनवून फसवणाऱ्या टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 04:37 AM2018-11-17T04:37:27+5:302018-11-17T04:38:24+5:30
सात जणांचा समावेश : पनवेल तालुका पोलिसांची कामगिरी; कंटेनरसह माल केला जप्त
मयूर तांबडे
पनवेल : बनावट कंपन्या व बनावट शिक्के बनवून शिपिंग कंपनी व कस्टमची फसवणूक करणाºया ७ आरोपींना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलेला आहे. इम्रान शेख व बशीर शेख यांनी अनुक्र मे लिमरा कंपनी व पी.एल.इंटरप्रायझेस या नावाने बनावट कंपन्या स्थापन केल्या. त्यांनी मे २०१७ मध्ये दुबईवरून कॉस्मेटिक्सच्या वस्तू मागवल्या. हा माल भवानी लॉजिस्टिक शिपिंग कंपनीच्या माध्यमातून कस्टम अधिकाऱ्यांनी अपोलो लॉजिस्टिक सोमटणे येथे ठेवण्यास सांगण्यात आला. मात्र इम्रान व बशीरने हा माल सोडविण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने कस्टमकडून माल सोडवता येत नव्हता.
वर्ष उलटून गेले तरी हा माल येथेच पडून होता. माल सोडवण्यासाठी विवेकानंद कवडे याच्याशी संपर्क साधला. या बदल्यात ठरावीक रक्कम देण्याचे त्यांच्यात ठरले. यासाठी विवेकानंद याने अक्षय फदाले याची मदत घेऊन खोट्या आयडेंटी कार्डचा वापर करून लॉजिस्टिक्समध्ये जाऊन रेकी केली. यावेळी त्याने आतील गेट पासचे फोटो काढले व त्यानुसार बनावट शिक्के बनविण्यासाठी ते गणेश मुळेकडे दिले. गणेश मुळेने जावेद शेख या इसमाकडे त्यांना पाठवले. जावेदने मुनवर शेख यांच्याकडून बनावट शिक्के बनवून घेतले. त्यानंतर बनावट गेटपास तयार करून त्यांनी किरण घोंगे याला आत पाठवले. त्याने बनावट पेपरच्या आधारे अपोलो लॉजिस्टिक सोमटणे येथून २ कंटेनर बाहेर काढले. लॉजिस्टिकच्या बाहेर येण्यासाठी साई गणेश नावाचे बनावट लेटर हेडचे आऊट गेट तयार केले व त्याच्यावर कस्टम अधिकाºयांचे बोगस शिक्के मारले.
यावेळी गेटवर असलेले कस्टम अधिकारी उत्तम कुमार मंडल व पोलीस हवालदार विश्वनाथ घाडगे यांनी कंटेनर बाहेर येताना गेटपास स्वत: तपासणे गरजेचे होते. मात्र त्यांनी गेटपास न बघता येथील वॉचमनला ते बघण्यास सांगितले. त्यामुळे बनावट शिक्के मारून बनविलेल्या गेटपासच्या आधारे माल लॉजिस्टिकच्या बाहेर आला.
अटक आरोपी पुढीलप्रमाणे
पोलिसांनी आरोपींविरोधात फसवणुकीचा, खोटे कागदपत्र तयार केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी फैय्याज पटनी (४१, अंधेरी), किरण घोंगे (२६, घाटकोपर), अक्षय फदाले (२७, घाटकोपर), गणेश मुळे (३३, लालबाग), मनवर मुल्ला (५३,मस्जिदबंदर), जावेद शेख (३२, मस्जिद बंदर), इम्रान शेख (२५, मस्जिद बंदर) या सात जणांना अटक केली आहे. अद्याप काही आरोपी फरार असून पोलिसांनी मालाचे दोन्ही कंटेनर व माल जप्त केला आहे.