बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव उधळला, १० हजार रुपयांसह एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 04:18 AM2018-07-13T04:18:17+5:302018-07-13T04:18:31+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव दक्ष व्यापारी व पोलिसांनी उधळवून लावला आहे.
नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव दक्ष व्यापारी व पोलिसांनी उधळवून लावला आहे. अँटॉप हिलमधील भाजीविक्रेता आलम शेखला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून दोन हजार रुपये किमतीच्या पाच नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
भाजी मार्केटमधील गाळा नंबर १६९मध्ये मोहम्मद हरिष रावडर हे आले विक्रीचा व्यवसाय करत आहेत. गुरुवारी सकाळी अँटॉप हिलमधून आलम रहीम शेख (३२) हा आले विकत घेण्यासाठी आला होता. माल खरेदी केल्यानंतर त्याने दोन हजार रुपयांची नोट दिली. रावडर यांना ती नोट बनावट असल्याची शंका आल्याने त्यांनी खरेदीदारास तसे सांगितले; पण आलमने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केल्यामुळे मार्केटमधील व्यापारी एकत्र आले व त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने एपीएमसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आलमला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन हजार रुपये किमतीच्या एकूण पाच नोटा आढळून आल्या. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडे चौकशी केली असता भिसीमध्ये हे पैसे मिळाले असून त्यातून भाजी खरेदी करण्यासाठी आलो असल्याची माहिती दिली.
मार्केटमध्ये बनावट नोटा देऊन भाजी खरेदी करणाऱ्या अँटॉप हिलमधील एक व्यक्तीस अटक केली आहे. त्याने या नोटा कोणाकडून आणल्या व अजून या गुन्ह्यामध्ये कोणाचा समावेश आहे का? याचा तपास सुरू आहे.
- सतीश निकम,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एपीएमसी
भाजी मार्केटमध्ये सकाळी एक खरेदीदाराने दोन हजार रुपये किमतीची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न केला. व्यापाºयाच्या दक्षतेमुळे हा प्रकार निदर्शनास आला असून, आम्ही संबंधिताला तत्काळ पोलिसांच्या हवाली दिले आहे.
- कैलास ताजणे,
अध्यक्ष,
भाजीपाला महासंघ