बनावट जीएसटी नोंदणी प्रकरणी गुन्हा, शासनाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 05:08 AM2019-10-12T05:08:35+5:302019-10-12T05:08:59+5:30
चंद्रकांत विठ्ठल सोनवणे, असे गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नवी मुंबई : अस्तित्वात नसलेल्या व्यवसायाचे बनावट जीएसटीची नोंदणी करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राज्यकर विभागामार्फत संबंधिताविरोधात सीबीडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घणसोली येथे व्यवसाय सुरू असल्याचे भासवून त्याने हा प्रकार केला आहे.
चंद्रकांत विठ्ठल सोनवणे, असे गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने घणसोली गावातील कौलआळीत स्वत:ची मे. कार्सन ओव्हरसिरज नावाची कंपनी असल्याचे शासनाला भासवले होते. त्याद्वारे चंद्रकांत याने राज्य शासनाच्या कर विभागाकडे जीएसटीची नोंदणी केली होती. त्यासाठी आॅनलाइन जोडलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीत तसेच प्रत्यक्ष जागेच्या पाहणीत शासनाची फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यानुसार चंद्रकांत सोनवणे व त्याच्या कंपनी विरोधात राज्यकर अधिकारी कल्पना पाटील यांनी तक्रार केली आहे. सोनवणे याने घणसोलीत व्यवसायाच्या ज्या जागेचा उल्लेख केला होता, तिथे इतर व्यक्ती दोन वर्षांपासून राहायला आहेत. यानंतरही जागामालकाच्या नावाची बनावट कागदपत्रे तयार करून ती कंपनीला भाड्याने दिली असल्याचे भासवले होते.