- वैभव गायकर, पनवेल
पनवेल परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी लिमोझीन या आलिशान गाडीची हुबेहूब नक्कल केलेली स्कॉर्पियो गाडी सोमवारी जप्त केली आहे. ही गाडी गोव्याच्या दिशेने जात असताना तळोजा हद्दीत पकडण्यात आली. एवढी आलिशान गाडी बघण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.तळोजा वाहतूक पोलिसांना सकाळी १0 वाजता लिमोझीन या आलिशान गाडीची हुबेहूब नक्कल केलेली स्कॉर्पियो गाडी निदर्शनास आली. त्यांनी याबाबत पनवेल परिवहन खात्याला कळविले. परिवहन खात्याचे मोटार वाहन निरीक्षक प्रदीप शिंगारे, अनिस बागबान यांनी ही गाडी पकडली.स्कॉर्पिओचा मूळ आकार बदलून तिला लिमोझीनचा आकार देण्यात आला असून एका दिवसासाठी तब्बल ८० हजार रूपये भाडे आकारत येत असल्याची माहिती समोर आली आहे. ही गाडी गोवा येथील एका प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाच्या लग्नासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे. गाडीची लांबी, दोन चाकामधील अंतर, वजन वाढविण्यात आलेले आहे. दोन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारची गाडी वाशी प्रादेशिक परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी पकडली होती. लग्नसराईत आलिशान गाड्यांची क्रे झ वाढत आहे. परिवहनने जप्त केलेल्या गाडीचे वजन ५६२ किलोने वाढवले असून दोन चाकांमधील अंतर २७०० मिलीने वाढवले आहे. बडोद्यावरु न निघालेली ही गाडी गोव्याला जात होती. गाडीच्या पाठीमागील सीट काढून केम्बर टाइप बनवली असल्याची माहिती देण्यात आली. बडोदा येथील मनीष पटेल यांच्या मालकीची ही गाडी असून शरीफ मोहम्मद दायमा हा चालक आहे. जीजे ११ एन ७१९९ या क्रमांकाच्या या गाडीची नोंदणी रद्दसाठी नोटीस पाठविण्यात आली असल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील यांनी दिली. अशा प्रकारच्या गाड्या या धोकादायक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.