कळंबोली : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मास्क खरेदीकडे कल वाढला आहे. त्यात एन ९५ मास्कची पनवेल परिसरात मागणी वाढली आहे. या संधीचा फायदा घेत काही दुकानदार एन ९५च्या नावाखाली बोगस मास्कची विक्री सुरू केली आहे. त्याचबरोबर, दुकान बदलले की, मास्कची किंमतही बदलत आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य परिस्थितीत कोरोनाबाधितांची संख्या १९ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. पनवेलकर याकडे गांभीर्याने पाहत आहेत. त्यानुसार, शासनाकडून दिलेल्या नियमाचे पालन करण्यात येत आहे. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे, या गोष्टी सातत्याने करण्यात येत आहेत.कामोठे, खारघर ही दोन शहरे पालिका हद्दीतील कोरोना हॉटस्पॉट ठरली आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना वाढीची चिंता नागरिकांना सतावत आहे. त्यानुसार, मास्क मोठ्या प्रमाणात विकत घेण्याकडे कल वाढला आहे. या संधीचा फायदा घेत, पनवेल परिसरातील दुकानदाराकडून एन ९५च्या नावाखाली बोगस मास्कची विक्री येत आहे. कित्येक दुकानात एन ९५चा शिक्का मारलेले मास्क आढळत आहेत. या दुकानदारांवर कोणाचाही अंकुश राहिले नाही. खरे मास्क ओळखणे कठीण बनले आहे. रस्त्यावर, दुकानात, मेडिकल स्टोअर्समध्ये या मास्कची विक्री वाढल्याने याचा फायदा काही विक्रेते उचलत आहेत. बोगस मास्क विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.संसर्गाचा धोका वाढलारस्त्यावर, तसेच अनेक दुकानांत मास्क विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये कापडी मास्क, तसेच साधे मास्क, एन ९५ नावाचे यासह अनेक मास्कची विक्री होत आहे. या मास्कचे दर ३० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत आहेत, परंतु ग्राहक हे मास्क घेण्यापूर्वी तोंडाला लावून बघतात. आवडले तरच विकत घेतात. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढत आहे.