नवी मुंबई : नेरूळमध्ये सुरू असलेल्या आगरी कोळी महोत्सवामध्ये रविवारी हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. भूमिपुत्रांच्या संस्कृती व इतिहासाचे दर्शन घडविणाऱ्या या महोत्सवामुळे लोककलांसाठीही भव्य व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास नवी मुंबई महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरातील सर्वात मोठा सांस्कृतिक मेळावा म्हणूनही ओळख असल्याने दिघा ते बेलापूर व पनवेल, उरणमधील हजारो नागरिक कार्यक्रमास उपस्थित राहात आहेत. पाचव्या दिवशी २० हजारपेक्षा जास्त नागरिकांनी महोत्सवास भेट दिली. एकविरा देवीसह, जेजुरीचा खंडोबा, विठ्ठल व इतर देवतांच्या प्रतिकृतीही ठेवण्यात आल्या आहेत. आगरी कोळी समाजाच्या वाटचालीची माहिती देणारे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. आतापर्यंत श्री शंकर प्रासादिक भजन मंडळ नेरूळगाव, बबन वैती यांचा, नाचानं रंगलाय कोळीवाडा, दिनेश जोशी यांचा आॅर्केस्ट्रा धुमधडाका व शनिवारी ‘लावण्यसंग्राम’ हा लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यांना शहरवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आगरी कोळी महोत्सवामध्ये खाद्यजत्रा व हायटेक राईडलाही नागरिकांची मोठ्या प्रमाणात पसंती दिली. आगरी कोळी पद्धतीचे जेवण, आकाशपाळणे, मौत का कुआ, जादूचे प्रयोग यांनाही मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. १५ जानेवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून त्यामध्ये रोज विविध लोककलांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. स्थानिक कलाकारांनाही त्यांची कला दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळू लागली आहे. संस्थेचे अध्यक्ष नामदेव भगत, रमाकांत म्हात्रे, बाळाराम पाटील, भालचंद्र कोळी, विजय पाटील, विठ्ठल भगत, इंदुमती भगत, गजानन म्हात्रे, अरविंद जनार्दन भोईर, सुखदेव कृष्णा तांडेल, रामचंद्र म्हात्रे, अमृत पाटील, पुंडलिक पाटील, दिलीप आमले व इतर पदाधिकारीही उपस्थित होते.
आगरी कोळी महोत्सवात लोककलांना मिळाले व्यासपीठ
By admin | Published: January 09, 2017 7:17 AM