दत्ता म्हात्रेपेण : पनवेल येथील कर्नाळा अभयारण्यात वसलेल्या कर्नाळा किल्ल्याची पडझड झाली आहे. सध्या जोरदार पाऊस तसेच वादळी वाऱ्यांमुळे किल्ल्यावरील वाड्याच्या भिंती ढासळल्या आहेत. तसेच लोखंडी रेलिंग वाकल्या आहेत. तसेच प्रवेशद्वार कमान आणि तटबंदी कधीही पडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे किल्ला धोकादायक होत असल्याच्या कारणास्तव व पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने वन विभागामार्फत बंदी घालण्यात आली आहे. या किल्ल्याची वर्षागणिक पडझड होत आहे. बुरुजाला तडे गेले असून किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेवर काही ठिकाणी दरड कोसळून भूस्खलनही होत असते. यामुळे वन विभागामार्फत पर्यटन व पर्यटकांसाठी किल्ला बंद ठेवण्यात आला आहे. वन विभागाच्यामार्फत येथील वाटा दुरुस्ती करण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे. राज्य संरक्षित स्मारकात किल्ल्याची नोंद नाही. त्यामुळे या किल्ल्याच्या दुर्ग अवशेषांची तटबंदी, बुरुज, पाण्याच्या टाक्या आणि प्रवेशद्वार यांची डागडुजी शास्त्रशुद्ध पद्धतीने होत नसल्याचा आरोप ट्रेकर्स तसेच विविध सामाजिक संस्था करीत आहेत. सह्याद्री प्रतिष्ठानकडून पाठपुरावासह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेकडून हा किल्ला संरक्षित स्मारकात नोंद व्हावी म्हणून राज्य पुरातत्त्व विभागाकडे एप्रिल २०१८ पासून पत्रव्यवहार सुरू आहे. पुरातत्त्व विभागामार्फत किल्ल्यावर अधिसूचना लावण्यात आली. परंतु अधिसूचनेची मुदत संपल्यानंतर अद्याप कोणतेही कारवाई झाली नाही. वन विभागालादेखील या संदर्भातील पत्रे देण्यात आली होती. संस्थेमार्फत किल्ल्यावर सागवानी प्रवेशद्वार लावण्यात आले आहे. स्वच्छता मोहिमाही राबविल्या जात आहेत.
रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध कर्नाळा किल्ल्याच्या संवर्धनासाठी वन विभाग आणि राज्य पुरातत्त्व विभागाने तत्काळ लक्ष द्यावे. - रोशन टेमघेरे, सह्याद्री प्रतिष्ठान सदस्य, पेण विभाग
कर्नाळा किल्ल्याचे अवशेष धोकादायक स्थितीत असल्याने किल्ल्यावर जाण्यासाठी प्रवेश बंदी केली आहे.सुरक्षा प्रंबध व पर्यटकांच्या जीवाला धोका पोहोचू नये ही जीवितहानी टाळण्यासाठी किल्यावर जाण्यासाठी बंदी आहे.किल्ला पायथ्याशी व इतरत्र बंदी नाही.या ठिकाणी सुरक्षेसाठी वनरक्षक जातीने ड्यूटी कर्तव्य बजावत आहेत..- नारायण राठोड, वनक्षेत्रपाल कर्नाळा अभयारण्य पनवेल वनविभाग