- नामदेव मोरे।नवी मुंबई : देशातील प्रमुख महानगरांप्रमाणे नवी मुंबईमध्येही भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर होत आहे. प्रत्येक प्रभागामधील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे त्रस्त झाले आहेत. विशेषत: रात्री रोडवर त्यांचेच राज्य असून पादचाºयांसह मोटारसायकलस्वारांवर कुत्र्यांकडून हल्ले होण्याचे प्रकार वाढत आहेत. कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे मोटारसायकलचे अपघात होण्याची संख्याही वाढत आहे. महापालिकेकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीप्रमाणे २०१६ - १७ या वर्षामध्ये तब्बल १४,५४६ नागरिकांना श्वानदंश झाला आहे. महिन्याला हे प्रमाण १२१२ एवढे असून रोज सरासरी ३९ नागरिकांना श्वानदंश झाल्याची घटना घडली आहे. रात्री रोडवून प्रवास करण्याचीही भीती वाटू लागली आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती, स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्येही वारंवार याविषयी आवाज उठविला जात आहे. नागरिकांमधील रोषही वाढू लागला आहे. पालिकेच्यावतीने श्वान नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. डम्पिंग ग्राउंडवर निर्बीजीकरण केंद्र सुरू केले असून महिन्याला ४५० ते ५०० निर्बीजीकरण शस्त्रक्रिया होत आहेत. परंतु कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेवून हे प्रमाण १००० ते १२०० करणे आवश्यक आहे.महापालिका प्रशासन श्वानदंशावरील लस व निर्बीजीकरणासाठी प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करत आहेत. परंतु अद्ययावत व प्रशस्त निर्बीजीकरण केंद्र उभारण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. पूर्वी पामबीच रोडवर कोपरीगावाजवळ श्वाननियंत्रण केंद्र होते. ती इमारत धोकादायक झाल्यानंतर केंद्र डम्पिंग ग्राउंडवर हलविण्यात आले आहे. पालिकेने तुर्भे उड्डाणपुलाखाली व नंतर सानपाडामध्ये नवीन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे त्या ठिकाणी केंद्र होवू शकले नाही. भविष्यात ही समस्या कायमस्वरूपी सोडवायची असेल तर महिन्याला सरासरी १५०० शस्त्रक्रिया करता येतील एवढ्या क्षमतेचे श्वाननियंत्रण केंद्र विनाविलंब उभारण्याची आवश्यकता असून लोकप्रतिनिधी व नागरिक याकडे कधी लक्ष देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आयुक्तांना शहरवासीयांचे साकडेश्वाननियंत्रण मोहीम यशस्वी करणारी देशातील एकमेव महापालिका होण्याचा बहुमान नवी मुंबईला मिळू शकतो. शंभर टक्के निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करून भटक्या कुत्र्यांचे प्रमाण पूर्णपणे नियंत्रणात येवू शकते. परंतु त्यासाठी महिन्याला १५०० शस्त्रक्रिया करता येतील एवढे मोठे केंद्र उभारण्याची गरज आहे.दहा वर्षांपासून त्यासाठी जागा शोधण्यात येत असून नागरिक व नगरसेवकांच्या विरोधामुळे दोन ठिकाणचा प्रस्ताव रद्द करावा लागला आहे. आता विद्यमान आयुक्त रामास्वामी एन. यांनाच नागरिक साकडे घालणार असून त्यांच्या कार्यकाळात पशुवैद्यकीय दवाखाना व श्वाननियंत्रण केंद्र उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पनवेलमध्येही स्थिती गंभीरनवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये श्वानदंश झाल्यास महापालिका मोफत उपचार मिळवून देत आहे. याशिवाय निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यासाठी एक केंद्र सुरू केले आहे. परंतु पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये श्वानदंशावरील उपचार व निर्बीजीकरण केंद्राकडेही पूर्णपणे दुर्लक्ष होवू लागले आहे.- स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईमध्येही भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर झाली आहे. २०१५ - १६ मध्ये तब्बल १४,५४६ नागरिकांना श्वानदंश झाल्याची घटना घडली असून रोजचे सरासरी प्रमाण ३९ एवढे आहे. पालिकेच्या केंद्राला पुरेशी जागा नसल्याने अपेक्षित गतीने निर्बीजीकरण होत नाही. दहा वर्षांपासून श्वाननियंत्रण केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यात प्रशासनासह लोकप्रतिनिधींना अपयश आले असून त्याचा फटका नागरिकांना बसू लागला आहे.
भटक्या कुत्र्यांची दहशत, निर्बीजीकरण केंद्रासाठी जागा मिळेना, प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 4:01 AM