माथाडींच्या घरांना असुविधांचा फास
By admin | Published: January 16, 2016 12:36 AM2016-01-16T00:36:46+5:302016-01-16T00:36:46+5:30
सिडकोने माथाडी कामगारांना घरासाठी वितरीत केलेल्या ४७१ ओट्यांसाठी मलनिस्सारण वाहिन्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरांसाठी ओट्यांची आखणी करताना सुमारे
नवी मुंबई : सिडकोने माथाडी कामगारांना घरासाठी वितरीत केलेल्या ४७१ ओट्यांसाठी मलनिस्सारण वाहिन्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरांसाठी ओट्यांची आखणी करताना सुमारे ३० वर्षांपूर्वी सिडकोने मलनिस्सारण वाहिन्या बसवल्या आहेत. मात्र सध्या त्या नादुरुस्त स्थितीत असल्याने ओटे वितरीत होऊनही त्यावर घर बांधणीला घरघर लागली आहे.
मुंबईतील बाजारपेठ नवी मुंबईत स्थलांतरित झाल्यानंतर त्या ठिकाणी काम करणाऱ्या माथाडी कामगारांसाठी घराचा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी माथाडी कामगारांच्या संघटनांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून सिडकोकडून माथाडी कामगारांसाठी घरे मंजूर करून घेतली. त्यानुसार १९९३ साली ५ हजार, तर १९९९ साली ४९० घरे माथाडींना प्राप्त झालेली आहेत. त्याचवेळी मंजूर झालेल्या घरांपैकी उर्वरित ४७१ घरांच्या ओट्याचे वाटप गतवर्षी सिडकोने केले आहे. कोपरखैरणे व लगतच्या परिसरात सिडकोने माथाडींना हे घराचे ओटे दिले आहेत. त्याची हस्तांतरण प्रक्रियादेखील पूर्ण झाली असून, अनेकांनी प्राप्त झालेल्या ओट्यांवर घराच्या बांधणीला सुरुवात केली आहे. याचवेळी त्यांच्यापुढे मलनिस्सारण वाहिन्यांचा गंभीर प्रश्न उद्भवला आहे. रिकाम्या ओट्यांवर घर बांधताना त्याला मलवाहिनी जोडायची कोणी, असा प्रश्न ओटेधारकांना पडला आहे. नगरसेवक शंकर मोरे यांनी यासंबंधी स्थायी समितीमध्ये प्रश्न उपस्थित करून त्याचे गांभीर्य व्यक्त केले. वसाहतीअंतर्गतची कामे करण्याला महापालिकेने नकार दिला आहे. तर सिडकोने ओटे वितरीत करून त्यांची जबाबदारी झटकली आहे. यामुळे मलवाहिन्यांचे काम करायचे कोणी, असा प्रश्न असल्याचेही मोरे यांनी सांगितले.
एकीकडे शहरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे, आवश्यक ठिकाणी झोपडपट्टी परिसरात शौचालये बांधली जात आहेत, मात्र दुसरीकडे घरांसाठी आवश्यक असलेल्या मलवाहिन्यांची जबाबदारी प्रशासन झटकत आहे. यामुळे माथाडी कामगारांवर आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. शिवाय मलवाहिन्या बसवण्याच्या कामात दिरंगाई अथवा हलगर्जी झाल्यास नागरी आरोग्याचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो. यामुळे प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रश्न सोडवण्याची मागणी नगरसेवक शंकर मोरे यांनी गुरुवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत केली. त्यानुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी कोपरखैरणे परिसरात सिडकोने वितरीत केलेल्या ओट्यांची पाहणी केली. (प्रतिनिधी)
सिडकोने सुमारे ३० वर्षांपूर्वी या ओट्यांची आखणी केलेली आहे. परंतु वितरणाअभावी वर्षानुवर्षे हे ओटे मोकळेच पडून होते. यामुळे काही ठिकाणी डेब्रिजचे ढीग तर काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ओट्यांचे वितरण करण्यापूर्वी सिडकोने त्यावरील अतिक्रमण हटवणे गरजेचे होते. मात्र जसे आहेत तशा स्थितीत सिडकोने या ओट्यांचे माथाडी कामगारांना हस्तांतरण केले आहे.